मुंबई: हिंगोली जिल्ह्याची हळदीचे विक्रमी उत्पादन घेणारा जिल्हा म्हणुन ओळख आहे. येथील हळदीला देशभरातून मागणी असते. त्याअनुषंगाने राज्य शासनाने आधुनिक पध्दतीने ओल्या हळकुंडावर प्रक्रिया करुन शेतकऱ्यांची हळद शिजविणे, वाळविणेसाठीचा खर्च कमी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रक्रिया केंद्र मंजूर केले आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हिंगोलीची हळद सातासमुद्रापार जाणार आहे. परिणामी, हळद पिकालाही महत्व येणार आहे. अनेकांना यातून रोजगार मिळणार असून, जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे हिंगोलीची हळद जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे.
हिंगोली परिसरात वायगाव प्रतिभा सेलम या जातीच्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. राज्यात मागील वर्षी हळद लागवडीचे एकूण क्षेत्र सुमारे 84 हजार 66 हेक्टर आहे. त्यापैकी एकट्या हिंगोलीत 49 हजार 764 हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्म्याहून अधिक आहे. याशिवाय जवळच्या नांदेड जिल्ह्यात 13 हजार 131 हेक्टर, वाशिम जिल्ह्यात 4 हजार 149 हेक्टर असे हळदीचे क्षेत्र आहे. मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील व्यापारी सांगली ऐवजी मराठवाड्यातील हळदीला पसंती देत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात मंजूर झालेल्या हळद प्रक्रिया उद्योगाने उच्चशिक्षित बेरोजगार युवकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.
जिल्ह्यात हळदीमध्ये अडचणीची बाब म्हणजे हिंगोलीसह मराठवाड्यातील हळदीत कुरक्युमीनची मात्रा कमी आहे. इथल्या हळदीचा रंग आणि चव उत्तम असल्यामुळे या हळदीला घरगुती वापरासाठी मोठी मागणी आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केंद्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पिकांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी रेडिएशन सेंटर, कूल स्टोअरेजची व्यवस्था होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भाभा परमाणू अनुसंधान केंद्राच्या अग्री बायोटेक विभागामार्फत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. हळदीचे संकरीत बियाणे, खत आणि पाण्याचे योग्य नियोजन व हळदीसाठी लागणारे कृषी अवजारे, यांत्रिकिकरण, बॉयलर व पोलिशर साहित्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी, कुरकुमीन तपासणी केंद्र, हळद निर्यात केंद्र, व्यवस्थापन, माती-पाणी तपासणी केंद्र आदी सुविधा केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. एवढेच नाही तर टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारुन त्यावरही काम केले जाणार आहे. एक जिल्हा एक पीक या योजनेत हिंगोलीचा अगोदरच समावेश झाला आहे. तसेच हळद काढणी पश्चात ओले हळकुंड शिजवणे, त्यांना सूर्यप्रकाशात वाळविणे हे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता नेहमीच भेडसावते. या समस्येवर मात करण्यासाठी समितीने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. हळकुंड तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. काढणी प्रक्रियेचा खर्च कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कच्ची हळद ते हळद पावडर करण्यासाठी केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था, म्हैसूर यांनी हळद काढणी पश्चात नवीन तंत्रज्ञान तयार केले आहे. तसेच पारंपारिक पध्दतीने शिजविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात लाकडांचा प्रयोग होत असल्यामुळे प्रदूषण होत असल्याचा कधीकधी आरोप होतो. आधुनिक पध्दतीने ओल्या हळकुंडावर प्रक्रिया करुन शेतकऱ्यांची हळद शिजविणे, वाळविणे यासाठीचा खर्च कमी करण्यासाठी जिल्ह्यात वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण प्रक्रिया केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हळदीला महत्व येणार आहे. शिवाय हळदीचे उत्पादन क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्याचा लाभ देखील होणार असल्याने यातून रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
शासनाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता दिली आहे. यास 100 कोटी रुपये निधीही उपलब्ध करुन दिला आहे. याचे काम वेगाने सुरु आहे. आपल्या भागात हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. या भागात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या बाजूला शासकीय जागा उपलब्ध झाल्यास 1100 कोटी रुपये खर्च करुन हळदीच्या कल्स्टरसाठी 100 एकर जागेवर लॉजिस्टीक पार्क उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहे फेब्रुवारी, 2023 मध्ये हिंगोली दौऱ्यावर आले असताना सांगितले आहे. येथे हळदीपासून विविध उत्पादने निर्माण केल्यास आपली हळद जगाच्या नकाशावर येऊन साता समुद्रापलीकडे जाणार आहे. सध्या जालना येथे एक्सपोर्ट-इम्पोर्ट सुरु होणार आहे. त्यामुळे हिंगोली येथील हळद सातासमुद्रापलीकडे जगात जाईल आणि शेतकरी समृध्द होतील.
दरम्यान, कोरोनानंतर हळदीला जगभरात मोठे महत्व आले आहे. पाश्चिमात्य राज्यात रोग प्रतिकार शक्ती वाढविणारा (इम्युनिटी बुस्टर) घटक म्हणून हळदीच्या गोळ्या विकल्या जात आहेत. स्टार बक्ससारख्या आंतरराष्ट्रीय चैन असलेल्या कॅफेमध्ये ‘गोल्डन टर्मरिक ल्याटे’ या नावाने हळदीचे दूध महागड्या दराने विकले जात आहे. युरोपात अल्झायमर व पार्किन्सन आदी आजारांच्या औषधामध्ये हळदीपासून निर्माण होण्याऱ्या तेलाचा वापर करण्यात येत आहे. हळदीमधील कुरकुमिनचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये त्वचा उजळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हळद प्रक्रिया करुन हळदीपासून निघणारी साल ही मच्छररोधक व अगरबत्तीमध्ये वापरण्यात येते. यापुढे हळदीच्या सालीलाही मोठी मागणी असणार आहे. तसेच कृत्रिम रंग उद्योगातही हळदीला मोठी मागणी आहे. त्यामुळे भविष्यात हिंगोलीसह संपूर्ण मराठवाड्यात हळदीचे मोठे क्लस्टर तयार करण्याचे आणि या क्लस्टरच्या माध्यमातून हळदीचे बेणे, सिंचन पध्दती यात बदल होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने हळदीवर संशोधन, मार्केटींग आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देणे या क्षेत्रात नवनवे संशोधन करण्यासाठी वसमत येथे बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्राची स्थापना सन 2022 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मान्यता देत 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सन 2022-23 या वर्षात 10 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून हळद संशोधन केंद्राच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्मितीचे काम सुरु आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जगातील हळदीखालील क्षेत्राचा विचार केल्यास 81 टक्के क्षेत्र भारतात आहे. त्यानंतर चीन 7 टक्के, म्यानमार 4 टक्के, नायजेरिया 3 टक्के, बांगलादेश 3 टक्के, तसेच व्हिएतनाम व श्रीलंका प्रत्येकी 1 टक्के याप्रमाणे क्रम येतो.
भारतात हळद हे मसाला पिकांतील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकुल वातावरण असल्यामुळे भारतात सर्वदूर हळदीची लागवड होऊ शकते. भारतात हळद प्रामुख्याने महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यात घेतली जाते. सन 2019-20 मध्ये देशात हळद पिकाखालील क्षेत्र 2.18 लक्ष हेक्टर होते. त्यापैकी 54 हजार 885 हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात होते. सन 2021-22 च्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण 1.02 लक्ष हेक्टर क्षेत्र हळद पिकाखाली आहे. राज्यात हळदीचे क्षेत्र प्रामुख्याने मराठवाड्यात सर्वाधिक आहे. राज्यातील हळद पिकाखालील क्षेत्रापैकी मराठवाड्यात हळद पिकाखाली एकूण क्षेत्र 82 हजार 9 हेक्टर म्हणजे 80 टक्के आहे.
जगात उत्पादित होणाऱ्या एकूण हळदीपैकी 80 टक्के हळद भारतात उत्पादित होते. देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातील हळद उत्पादनाचा विचार करता राज्यातील एकूण उत्पादनाच्या 60 टक्क्याहून जास्त वाटा एकट्या हिंगोली जिल्ह्याचा आहे. सन 2021-22 मध्ये राज्यातील हळद पिकाखालील क्षेत्र 1 लाख 2 हजार 162 हेक्टर होते. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात 49 हजार 764 हेक्टर, नांदेडमध्ये 21 हजार 414, परभणीत 8 हजार 807 हेक्टर, यवतमाळ 6 हजार 166 हेक्टर, वाशिम 5 हजार 604 हेक्टर, सातारा 1 हजार 788 हेक्टर, बुलढाण्यात 1 हजार 525 हेक्टर, जालन्यात 1 हजार 77 हेक्टर, जळगावात 984 हेक्टर, चंद्रपूरमध्ये 784 हेक्टर, सांगली 778 हेक्टर, भंडारा 395 हेक्टर, लातूर 352 हेक्टर, नागपूर 351 हेक्टर, गोंदियात 341 हेक्टर, इतर जिल्ह्यात 2 हजार 32 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
हळद उत्पादनात एकट्या हिंगोली जिल्ह्याचा 60 टक्के वाटा आहे. हिंगोली जगात सर्वाधिक हळद पिकविणारा जिल्हा महणून जागतिक नकाशावर झळकत आहे. आजवर सांगलीची हळद बाजारपेठ जगात प्रसिध्द होती. सांगलीसह सातारा, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमा भागातील हळद विक्रीसाठी सांगलीत येत होती. आता हिंगोली, वसमत, वाशिम, नांदेड येथे हळदीचे सौदे होऊ लागले आहेत. बाजारपेठ उपलब्ध झाल्याने आणि सरासरी नऊ हजार ते दहा हजार प्रती क्विंटल दर मिळतो. टिश्यू कल्चरची रोपे, औषधे, कीडनाशके, सेंद्रीय हळद उत्पादन करण्याची शास्त्रशुध्द पध्दतीचा विकास, हळदीची काढणी पश्चात प्रक्रिया, मसाल्यासह विविध ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांचे आणि सौंदर्य प्रसाधनाच्या उत्पादनाचे कारखाने आणि हळदी विक्रीची जागतिक साखळी निर्माण करण्यासाठी काम सुरु असल्याचे यातील तज्ज्ञ सांगत आहेत. सध्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. जिल्ह्यात हळदीचे आतापर्यंत केवळ विक्रमी उत्पादन होत होते. परंतू या संशोधन केंद्रामुळे तंत्रशुध्द पध्दतीने वाढीव उत्पादन कसे घ्यावे याची शेतकऱ्यांना माहिती होणार आहे. तर याच ठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारले जाणार असून, तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. राज्यात सर्वाधिक हळदीचे उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यात होत असून, येथून अधिकची निर्यात केली जात होती. मात्र, प्रक्रिया उद्योगामुळे व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी आणि उच्चशिक्षित बेरोजगार युवकांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहे. त्यामुळे हा प्रकल्प संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.