नवी दिल्ली ; वृत्तसेवा : थेट विदेशी गुंतवणुकीत भारत अव्वल असून, चिंतेचे काहीही कारण नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. काँग्रेसचे सदस्य शशी थरूर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
भारतीय भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात निधी काढून घेतला (आऊटफ्लो) तरी ती जागा भरून काढण्याची क्षमता देशाच्या रिटेल गुंतवणूकदारांनी तयार केलेली आहे, असे सांगून सीतारामन म्हणाल्या की, विदेशी गुंतवणूक म्हणजे केवळ विदेशी संस्थागत गुंतवणूकदार अथवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार अथवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स येतात आणि जातात. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 1.40 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली.
सहा नव्या खासदारांनी घेतली शपथ
राज्यसभेत सोमवारी सहा नव्या खासदारांनी शपथ घेतली. यात आसाम, केरळ आणि नागालँडमधील खासदारांचा समावेश आहे. भाजपचे पवित्र मार्गारिटा, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) चे रवंगवरा नारजारी, केरळमधून काँग्रेसचे जे. बी. माथेर हीशम, भाकपचे संदोष कुमार आणि माकपचे ए. ए. रहिम, नागालँडच्या भाजपच्या खासदार एस. फान्गनॉन कोन्यक आदींनी या वरिष्ठ सभागृहाची शपथ घेतली. नागालँडमधून राज्यसभेत आलेल्या त्या पहिल्याच महिला आहेत.
महागाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईविरोधात विरोधकांनी सातत्याने केंद्राला लक्ष्य केले असून, सोमवारी राज्यसभेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी महागाईसह पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून गदारोळ घातला. त्यामुळे शून्य प्रहर आणि प्रश्नकाळ होऊ शकला नाही. सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. 12 वाजता पीठासीन अधिकार्यांनी प्रश्नकाळासाठी सदस्यांचे नाव पुकारले तेव्हा काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी घोषणा द्यायाला सुरुवात केली. सर्व सदस्य उभे राहून घोषणा देऊ लागले. तृणमूलचे काही सदस्य घोषणा देत सभापतींच्या आसनाजवळ गेले. वारंवार सांगूनही हे सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते घोषणा देतच राहिले. अखेर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले गेले.