मराठा किल्ल्यांना जागतिक गौरव – युनेस्कोची मान्यता –प्रविण शेजूळ
भारताच्या संस्कृतीच्या वैभवशाली वारशामध्ये किल्ल्यांचे स्थान फारच महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्रातील मराठा किल्ले – जे शिवछत्रपतींच्या शौर्याची आणि रणनीतीची साक्ष देतात – आता संपूर्ण जगाच्या लक्षात आले आहेत. २०२५ साली युनेस्कोने या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ म्हणजेच मराठा सैनिकी वारशाचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे, ही प्रत्येक भारतीय मनासाठी अभिमानाची बाब आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे. तामिळनाडूचा जिंजी किल्ला देखील या यादीचा भाग आहे. सर्व किल्ले १७ व्या ते १९ व्या शतकादरम्यान बांधले गेले.
पॅरिसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या ४७ व्या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. यामुळे मराठा इतिहास आणि वारशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. आता भारतातील एकूण ४४ वारसा स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
कसली आहे ही मान्यता?
युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक संस्था जी संपूर्ण जगभरातील सांस्कृतिक, नैसर्गिक व ऐतिहासिक स्थळांना जागतिक वारसा मान्यता देते. या मान्यतेसाठी केवळ सौंदर्यच नव्हे, तर त्या स्थळाचे ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक मूल्यही पाहिले जाते.
‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ अंतर्गत एकूण १२ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे – त्यातील ११ महाराष्ट्रात आणि १ तमिळनाडूमध्ये आहे. यात राजगड, रायगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा साम्राज्यातील किल्ले
यादीत समाविष्ट किल्ल्यांची एकूण संख्या: १२
महाराष्ट्रातील किल्ले: ११
तामिळनाडूमधील किल्ला: १ (जिंजी किल्ला)
बांधकाम कालावधी: १७वे ते १९वे शतक
एकूण क्षेत्रफळ (कोअर + बफर झोन): सुमारे ७२० चौ. कि.मी.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुरुवातीला पाहणी केलेले किल्ले: ३९०
नामनिर्देशनासाठी अंतिमतः निवडलेले किल्ले: १२
निवडलेले गड (डोंगरी किल्ले): ८
निवडलेले सागरी/किनारी किल्ले: ४
भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या (या समावेशानंतर): ४४
कशामुळे हे किल्ले विशेष ठरले?
या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सैन्यदृष्ट्या बांधणी, भौगोलिक रचना आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना. हे किल्ले समुद्रकाठी, बेटांवर, डोंगराळ भागांत व दाट जंगलांमध्ये स्थित असून मराठा साम्राज्याच्या १७व्या ते १९व्या शतकातील लष्करी दूरदृष्टी, स्थापत्यकलेतील कल्पकता आणि भौगोलिक आकलनाचे अप्रतिम दर्शन घडवतात. भारताच्या प्रस्तावास युनेस्कोच्या २० पैकी १८ सदस्यांनी पाठिंबा दिला. युनेस्कोच्या ICOMOS आणि IUCN संस्थांनीही भारताचे अभिनंदन केले.
हे किल्ले त्या काळात संरक्षण, युद्धनिती आणि संदेशवहन यासाठी वापरले जात होते. प्रत्येक किल्ल्याची रचना त्या ठिकाणच्या भूगोलानुसार नीट अभ्यासून केली गेली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि नंतर मराठा साम्राज्याच्या विस्तारात या किल्ल्यांची भूमिका महत्त्वाची होती. म्हणूनच हे केवळ इमारती नाहीत – तर ते इतिहासाचे साक्षीदार आहेत.
याचा परिणाम काय होईल?
- जागतिक पर्यटनात वाढ – या स्थळांकडे आता परदेशी पर्यटकांचेही अधिक लक्ष वेधले जाईल.
- संवर्धनाला गती – या स्थळांच्या संरक्षणासाठी अधिक काटेकोर उपाययोजना केल्या जातात. पुनर्बांधणी, देखभाल आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय निधी व तज्ज्ञांची मदत मिळू शकते,किल्ल्यांचे जतन व संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल.
- स्थानिकांना रोजगार – मार्गदर्शक, हॉटेल व्यवसाय, हस्तकला विक्रीसारख्या अनेक गोष्टींमधून स्थानिकांना नवे रोजगार मिळतील.
- अभिमान वृद्धिंगत – पुढील पिढी मध्ये आपल्या इतिहासाची जाणीव आणि अभिमान निर्माण होईल.
युनेस्कोच्या या मान्यतेमुळे आपल्याला एक संधी मिळाली आहे – आपल्या इतिहासाचे जतन करण्याची, आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची. शिवरायांच्या पवित्र किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळाली आहे. आता आपली जबाबदारी आहे – हे वारसास्थळ जतन करण्याची आणि त्यांचा सन्मान राखण्याची.
या ऐतिहासिक मान्यतेमुळे भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा गौरवपूर्ण प्रदर्शन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले.
“मातीचा गोळा नव्हे तो गड, तो शिवछत्रपतींच्या इतिहासाचा कणा आहे!”
New inscription on the
#WorldHeritage List: Maratha Military Landscapes of India, #India