[ad_1]
अंमली पदार्थ विरोधी खात्याचे मुंबईमधील विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी जातीसंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कागदपत्रे व्यवस्थित असल्यास त्यांच्या हक्कांचे निश्चितपणे रक्षण केले जाईल, असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष विजय सांपला यांनी सोमवारी स्पष्ट केले. समीर वानखेडे यांनी आयोगाच्या कार्यालयात जाऊन सांपला तसेच आयोगाचे सदस्य रमेश सुभाष पारधी यांची भेट घेतली.
समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या जातीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामध्ये कुठेही विसंगती आढळली नाही तर वानखेडे यांच्याविरोधात कोणीही कसलीही कारवाई करु शकणार नाही, असे विजय सांपला यांनी नमूद केले. समीर वानखेडे हे दलित नसून मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. एका दलिताचा अधिकार त्यांनी हिरावून घेतला असल्याचे सांगत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर दररोज टीकेची झोड उठविलेली आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या अध्यक्षांची भेट घेत आपली बाजू मांडली.
वानखेडे यांनी धर्म आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व कागदपत्रे दिली आहेत. ती आम्ही राज्य सरकारकडे पाठविली असून ही कागदपत्रे बरोबर असल्याचे आढळल्यास त्यांना त्रास दिला जाऊ नये, असे सांपला म्हणाले.
जन्म प्रमाणपत्र, पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाबाबतची कागदपत्रे वानखेडे यांनी आयोगाकडे दिली असल्याचे समजते. वानखेडे यांच्यासह काही अन्य लोक खंडणीच्या कामात गुंतले असून आर्यन खान प्रकरणात 25 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप झालेला आहे. आरोपांची सरबत्ती करण्यात नवाब मलिक हे सर्वाधिक आघाडीवर आहेत. समीर वानखेडे यांनी यासंदर्भात राष्ट्रीय अनु.जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. वानखेडे यांनी धर्मपरिवर्तन केलेले नाही, असे या भेटीनंतर हलदर यांनी सांगितले होते.
हे ही वाचलं का?
[ad_2]