शिवरायांच्या बदनामीचे सुत्रधार

दक्षिण भारतात छत्रपति शिवरायांना आदर्श मानुन राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे आणि सामाजिक कार्याचे प्रयोग चालतात. छत्रपति शिवाजी स्फुर्ती केंद्रम हा आंध्रप्रदेशातील तेलुगु शिवभक्तांनी चालवलेला प्रकल्प केवळ इमारत नाही तर शिवरायांचा जाज्वल्य आणि मुर्तीमंत इतिहासाचे जीवंत स्मारक आहे. स्फूर्ती केंद्राने मराठ्यांचा 1630 ते 1818 या कालखंडातील दैदीप्यमान इतिहास जगाला कळावा,यासाठी मराठी आणि इंग्रजीत ‘शिवछत्रपतिंचा वारसा’ या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. या ग्रंथाच्या पानापानावर मराठ्यांचा पराक्रम, देशातील धर्म, साहित्य कला,संस्कृतीचे मराठ्यांनी केलेले रक्षण आपल्याला वाचायला मिळते.

महाराष्ट्रात मात्र महाराजांच्या नावावर केवळ भावनिक राजकारण केले जाते. महाराष्ट्रातील जातीयवादी राजकारणी हेच मोठे इतिहासकार झालेत…कुठे चाललोत आपण??

 

महाराजांचा अपमान झाला यापेक्षा तो कोणी केला? यावर त्याची प्रतिक्रिया ठरते. आणि ज्यांची हयात महाराजांचा अवमान आणि तेजोभंग करण्यात गेली ते लोक याविषयी बोलतात. औरंगजेबाचा अपमान झाला म्हणून उपोषण करणारे महाराजांविषयी बोलतात. विनोद अनाव्रत नावाच्या हरामखोराने महाराजांची बदनामी करणारे पुस्तक लिहिले,त्याचा सत्कार बामसेफ ही आयोजकापैकी असलेल्या एल्गार परिषदेत झाला. त्याच बामसेफच्या व्यासपीठावर जाणारे महाराजांचा अपमानावर बोलत आहेत.

शाहू,फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याला कधीही शिवाजीमहाराजांचा महाराष्ट्र वाटला नाही अशा नेत्याला महाराजांची ‘जाणता राजा’ ही उपाधी गेली अनेक दशके वापरत आहोत. अशा जाणत्या राजाची (?) अजाणती लेक छत्रपति शंभुराजांची बदनामी केलेल्या गिरिश कुबेरच्या पुस्तकाला interesting म्हणते,तेच आज महाराजांच्या अपमानावर बोलत आहे.

 

महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफजलखानाला जो ‘सीमेचा रक्षक’ म्हणाला आणि काही दिवसांपूर्वी महाराजांची उंची साडे- चार पाच फुट होती आणि अफजलखान केवढा मोठ्ठा होता,हे टिव्हीवर सांगितले. महाराजांची उंची मोजायची याची लायकी कोणी का विचारली नाही? हे आज अपमानावर बोलत आहेत.

 

औरंगाबादच्या नामांतराला ज्याचा विरोध आहे,ते आज महाराजांच्या सन्मानाच्या गप्पा करत आहेत.हे समाजाने समजून घेणे गरजेचे आहे.

‘छत्रपति संभाजीनगर’ नामांतराला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल करणारा कोणाचा कार्यकर्ता आहे? त्याच्या पक्षाने त्याच्यावर काय कारवाई केली?

 

इरफान हबीब याचे पुस्तक काँग्रेस राजवटीत कालपरवापर्यंत शिकवले गेले त्यात ‘शिवाजीचे सैन्य म्हणजे उघडे,नागडे,उपाशी चोर’ म्हटले गेले,तेच शिकुन आमच्या पिढ्या आयएएस,आयपीएस झाल्या. पुरातत्वखात्यात गेल्या,अशा आधिकार्यांना महाराजांच्या गडकिल्ल्यांविषयी काय आस्था राहील? या इरफान हबीबला बाप मानणारे आज महाराजांच्या अपमानावर बोलत आहेत.

अफजलखानाच्या थडग्याची कबर झाली,कबरीचा उरुस झाला. विशाळगड इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत.अनेक किल्ल्यांवर अचानक हिरव्या मजारी उगवल्या आहेत, हे होत असतांना जे गप्प बसले त्यांना आज महाराजांचा अपमान आठवला आहे.

 

महाराणी सईबाई,महाराणी ताराबाई आणि छत्रपति थोरले शाहु यांच्या समाध्या या आमच्या साठी तीर्थाइतक्याच पवित्र! पण या समाध्यांकडे इतकी वर्षे दुर्लक्ष का? औरंगजेबाच्या बायकोच्या कबरीवर पुरातत्व खात्याच स्वत:च्या बायकोइतके प्रेम आहे,मग रयतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर आसवांच्या मुंडावळ्या आणि विरहाचा अंतरपाट सहन केलेल्या महाराणी सईबाईंच्या समाधिची उपेक्षा का ? यासाठी धरणे,उपोषण आणि आंदोलन का होत नाही?

 

शिवचरित्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना बदनाम करण्यात येते…..आणि जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवणारे आनंद पटवर्धन ,प्रमिला निलकंठसारखे लोक विचारवंत म्हणून मिरवतात अजब कलियुग यालाच म्हणावे का? याच महाराष्ट्राच्या धरतीत फ्रान्सिस ग्वातिए नावाच्या फ्रेंच माणसाने शिवरायांच्या जीवनावर स्वखर्चाने भव्य चित्रमय सृष्टी निर्माण केली ,त्याचे आम्हाला कौतुक वाटणे सोडा,त्याला विरोध करण्याचे पातक इथल्या नतद्रष्टांनी केले आहे.

 

जाडजुड पाकीट मिळाल्याशिवाय जे शिवाजीमहाराजांवर बोलायला तोंड उघडत नाहीत,तेच आजच्या समाजाचे हिरो झाले आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सरनौबतांना बलात्कारी म्हणून अपमान केला तरी इथला समाज थंड बसतो. हे लोक शिवरायांच्या सैन्यात 35% पासुन 90% पर्यंत मनाला वाटेल तेवढे मुसलमान भरती करतात. हिंदवी स्वराज्यातुन हळूहळू मराठ्यांना वजा करण्याचा उद्योग चालला आहे,तरीही महाराष्ट्राला त्याचे काहीही वाटत नाही.

 

महाराष्ट्रातील भाजप ही देखील मेंगळ्यांची पार्टी आहे. दीनदयाल उपाध्याय,अटलजी ते मोदी यांच्यापर्यंतचा शिवसन्मानाचा जाज्वल्य इतिहास यांना समाजासमोर मांडता आला नाही. दीनदयाल उपाध्याय यांनी आपले जीवन देशासाठी द्यायचा निर्णय केला,तेव्हा आपल्या मामांना पत्र लिहिले,त्यात छत्रपति शिवाजीमहाराजांचा किती गौरवाने उल्लेख आहे.

अटलजी हे तर शिवचरित्राचे भक्तच होते. अनिल दवे नावाच्या भाजपच्या केंद्रीयमंत्र्याने ‘छत्रपति शिवाजी आणि सुराज्य’ नावाचे पुस्तक लिहुन किती मोठे काम केले आहे. हे भाजप कार्यकर्त्यांना तरी माहिती आहे का? शंकाच आहे. वर्तमान राजकारणाशी महाराजांच्या चरित्रातील कोणत्याच प्रसंगाची तुलना होऊ शकत नाही.हे भाजप नेत्यांना कळू नये का? दीनदयालजी,अटलजी,आडवाणीजी,मोदी यांचा एवढा मोठा आदर्श असतांना महाराष्ट्रातील भाजप दिशाहीन का? भाजपने आपल्या कार्यकर्त्यांचे शिवचरीत्र वर्ग घेण्याची गरज आहे. शिवाजीमहाराजांवर अनावश्यक टिप्पणी करणार्या नेत्याविषयी भाजपने कठोर भुमिका घ्यावी.

 

दिल्लीच्या संसद भवनासमोर शिवछत्रपतिंचा पुतळा नव्हता,तो अटलजींच्या काळात उभारला.

शिवतीर्थ रायगडाला मोठा निधी देणारे पहिले पंतप्रधान अटलजीच आहेत. डाॅ.जयसिंगराव पवार संपादीत ‘छत्रपति संभाजी स्मारक ग्रंथात’ अटलजींचा शंभुराजावरील छापलेले भाषण प्रत्येक देशभक्ताने वाचावे इतके अप्रतिम आहे.

छत्रपति शिवरायांचे दोन रुपयाचे नाणे अटलजींच्याच काळात मुद्रीत केले गेले. काँग्रेसचा इतिहास हा छत्रपति शिवरायांच्या अपमानाचा झाला अाहे तर भाजपचा इतिहास हा शिवछत्रपतिंच्या सन्मानाचा आहे हे प्रथम भाजप नेत्यांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवसन्मानाचा वारसा चालवण्याची जबाबदारी तुमची आहे.अलीकडे भाजप कार्यकर्ते टिपु सुलतान जयंतीत सहभागी होत असल्याच्या बातम्या कानावर पडतात. हा छत्रपति शिवाजीमहाराजांचा मोठा अपमान आहे हे लक्षात घ्या.

 

शिवचरित्र हे गंगेइतके पवित्र आणि हिमालयाएवढे उत्तुंग आहे. महाराष्ट्राला आणि भारताच नव्हे तर जगाला कुतुहल वाटावा एवढा मोठा महापुरुष आपल्या भूमीवर होऊन गेला. पण दुर्देवाने आपण त्यांच्या नावावर राजकीय आणि पक्षीय स्वार्थ साधणारे होतोय का? स्वत: च्या स्वार्थासाठी उभ्या केलेल्या संघटना लाँच करण्यासाठी वापर करतोय का? याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

महाराजांशी लढलेल्या पोर्तुगीजांनी त्यांची तुलना अलेक्झांडर आणि ज्युलियस सिझरशी केली आहे. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या मते शिवाजीमहाराज या दोघांपेक्षाही सरस होते. नेपोलियनवर आजपर्यंत 27000 पुस्तक उपलब्ध आहेत,पण महाराजांवर 27000 पाने तरी आपण लिहु शकलो का? महाराजांच्या प्रशासन,व्यापार आणि दुर्गबांधणीवर किती पुस्तके आहेत? जे लिहीतात ,अभ्यास करतात त्यांचीच आम्ही बदनामी करतो आणि महाराजांवर लिहीण्याची,अभ्यास करण्याची प्रेरणाच मारुन टाकतो. डाॅ.ग.ह.खरे,राजवाडे, गजानन भास्कर मेहेंदळे या लोकांनी मराठ्यांच्या इतिहासाला आपले आयुष्य वाहुन घेतले. यांच्याप्रती आम्हाला कृतज्ञता आहे का? यांच्यापेक्षा आम्हाला बाजारु लोक मोठे वाटतात,ज्यांना मराठी लिहीता येत नाही,ते इतिहास संशोधक वाटतात? किती मोठे दुर्देव!!

 

जापानमधील डाॅ. फुकाजावा इतिहासाचे पंडीत भारतात आले होते.त्यांनी प्रांजळपणे सांगितले की ‘मी भारतात मुघलांचा अभ्यास करायला आलो होतो पण मला शिवचरित्राने इतका भारावलो की मी मुघल सोडुन शिवचरित्राचाच अभ्यास करायला सुरुवात केली. जापानला परत गेल्यानंतर फुकाजावा यांनी जापानी भाषेत शिवचरित्र लिहिले आहे. इस्त्राईलच्या एका महिलेने भारतात येऊन शिवचरित्राचा अभ्यास केला. एकाने तर महाराजांना ‘आतेला’ म्हणजे ‘सुपरमॅन’ म्हटलय. जगभरातील खूप लोक शिवचरित्राचा अभ्यास करत आहेत. आणि आम्ही इथ अपमान – अपमानाचा खेळ खेळतोय.

 

छत्रपति शिवाजीमहाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे यौध्दे होते.ते हयात असतांनाच त्यांची कीर्त सातासमुद्रापार पोहोचली होती. छत्रसाल बुंदेलासारख्या वीरांनी शिवाजीमहाराजांची प्रेरणा घेऊन स्वराज्य निर्माण केले. एवढेच नाही तर हिंदूस्थानभर मराठ्यांचा डंका वाजवणारा नानासाहेब पेशवाही स्वत:ला शिवाजीमहाराजांचा शिष्य म्हणवतो….स्वामी विवेकानंद ,लोकमान्य टिळक,महात्मा फुले,भगतसिंह,लाला लजपतराय,सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनातही आम्हाला शिवरायांची प्रेरणा दिसते. अवघ्या भारताला परमवैभवाला नेण्यासाठी शिवचरित्राइतके प्रेरणादायी अजुन काय असणार? त्यामुळे शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.त्यासाठी शिवचरित्र घराघरात गेले पाहिजे.

विवेकी आचार विचारांचा उदय व्हावा हीच अपेक्षा!!

– ॲड. उमेश जाधव पाटील

Leave a Reply