नवी दिल्लीः भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचं गुरुवारी निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय ९८ वर्षे होतं. अधिकचं भरघोस उत्पादन देणाऱ्या धानाच्या जाती विकसित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आ परिवार आहे.
डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी चेन्नईमध्ये एमएस स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली.आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅगसेसे पुरस्काराने त्यांना 1971 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच 1986 मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात एमएस स्वामिनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. त्यांनी भाताच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू लागले.
मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गुरुवारी सकाळी त्यांनी शांतपणे देह सोडला. शेवटपर्यंत ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि समाजातील गरीबांच्या उन्नतीसाठी काम करत होते.