Education News : खुशखबर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता ऑनलाईन शिक्षणाची संधी; कुलगुरूंची महत्त्वाची घोषणा

दूरस्थ शिक्षणानंतर आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाइन पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून एमबीए, एमसीए, बीसीए, बीबीए आणि एमए (इंग्रजी) हे अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार असून, यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठात प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. कुलगुरू डॉ. सोनवणे म्हणाले की, यापूर्वी विद्यापीठामार्फत मर्यादित कालावधीचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होते. मात्र, आता पदवी व पदव्युत्तर शिक्षण ऑनलाइन सुरू करण्यासाठी दूरशिक्षण ब्युरोकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाल्याने आगामी शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन असलेल्या विद्यापीठांनाच ऑनलाइन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी देण्यात आली असून, मुक्त विद्यापीठाला ही मान्यता मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या अनुवाद विषयावरील परिषदेच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘ब्लेंडेड लर्निंग’ आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सायबर क्राइम इन्‍व्‍हेस्टिगेशनला प्रतिसाद

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विद्यापीठाने ‘डिप्लोमा इन सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होत असल्याचे डॉ. सोनवणे यांनी नमूद केले.

कुलगुरू डॉ. सोनवणे म्‍हणाले…

एआय फॉर हॉर्टीकल्‍चर अभ्यासक्रम अवगत केला जाईल.

विधी शाखेतील एलएलएम या पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रयत्‍नशील

विद्यापीठ बौद्धिक संपदा वाढविण्यावर आहे भर

कीर्तनावर आधारित अभ्यासक्रमासाठी प्रयत्‍न सुरु

जेएनपीएकडून सीएसआरद्वारे पाच कोटी निधी.

या निधीतून कौशल्‍य अभ्यासक्रम सर्वेक्षणाचे काम

पालघरच्‍या प्रकल्‍प बाधित क्षेत्रात सर्वेक्षण करणार

सर्वेक्षणात कौशल्‍य विकासाचा अभ्यास केला जाईल

 

Leave a Reply