जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे 10 वी सोबतच ITI शिक्षण पूर्ण झाले असेल, तर भारतीय रेल्वेमध्ये तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एकूण 2801 पदांसाठी होणाऱ्या या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बहुतांश पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
उमेदवारांची निवड थेट त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर म्हणजेच मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना 10 वी आणि ITI मध्ये चांगले गुण आहेत, त्यांच्यासाठी अप्रेंटिसची ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
वयोमर्यादा किती?
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे. वयाची गणना 11 एप्रिल 2026 या तारखेनुसार केली जाईल. नियमानुसार, SC, ST, OBC आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 एप्रिल 2026 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाले तर, उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच, ज्या ट्रेडसाठी अर्ज करायचा आहे, त्या संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून ITI सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. अर्जासाठी सामान्य (General), OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि सर्व महिला उमेदवारांसाठी कोणताही अर्ज शुल्क ठेवण्यात आलेला नाही.
अशी’ असेल निवड प्रक्रिया
या भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे. 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीनुसार एक गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल. या यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी (Document Verification) बोलावले जाईल आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या सर्व टप्प्यांनंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या rrc.scr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.