मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा…

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पी अधिवेशनात झाला आहे. मात्र, थकबाकीतील दोन लाखांचे पीककर्जच माफ होणार की मध्यम मुदतीच्या कर्जाचा देखील त्यात समावेश आहे, हा संभ्रम आहे.
३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ होणार आहे. त्यात पीककर्ज, मध्यम मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश असेल, अशी माहिती सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे थकबाकी आहेत. त्यांच्याकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी असून त्यात पीककर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश आहे. सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंकांसह अन्य बॅंकांकडील सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. त्यात एक-दीड लाख रुपयांपर्यंतच पीककर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय बहुतेक शेतकऱ्यांचे पीककर्ज नियमित आहे, मात्र मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे. त्यामुळे दोन लाखांची कर्जमाफी निकषांनुसार पात्र सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

केवळ दोन लाखाचे थकीत पीककर्जच माफ होईल, असा निकष नसणार असल्याचेही सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. बॅंकांकडून प्राप्त थकबाकीदारांची व नियमित कर्जदारांची माहिती आता सहकार विभागाकडून वित्त विभागाला सादर होणार आहे. वित्त विभागाकडून त्यावर कार्यवाही होईल आणि कर्जमाफीसाठी निधी मंजूर होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

शेतकऱ्यांकडील पीककर्जाची परतफेड करण्याची शेवटची मुदत ३० जूनपर्यंत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली दोन लाखांची कर्जमाफी मुदतीत मिळेल. त्यादृष्टीने सध्या संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरु आहे.

– दत्तात्रेय भरणे, कृषी मंत्री

थकबाकीदारांना दोन लाखांची माफी

राज्यातील २४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे बॅंकांचे ३६ हजार कोटींपर्यंत थकबाकी आहे. त्यात सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई,जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व अहिल्यानगर या जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यात पीककर्ज असो की शेतीवरील मध्यम मुदतीचे कर्ज, त्या थकबाकीतील दोन लाख माफ होतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडील थकीत कर्जाची स्थिती

एकूण शेतकरी

१,३३,४४,२०९

थकबाकीतील शेतकरी

२४,७३,५६६

एकूण थकबाकी

३५,४७७ कोटी

आता मिळणारी कर्जमाफी

२ लाख रुपये

कर्जमाफीची तारीख

३० जूनपूर्वी

Leave a Reply