महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या उत्पन्न मर्यादेत वाढ
मुंबई : महाराष्ट्रात 2 जुलै 2012 पासून राबविण्यात येणारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या योजनेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, 23 सप्टेंबर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून नि:शुल्क गुणवत्तापूर्ण उपचार देण्याच्या हेतूने राबविण्यात येते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचार सामायिक असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींसाठी अतिरिक्त 213 उपचार मिळून एकूण 1,209 उपचार समाविष्ट करण्यात आले आहेत. योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच 2 जुलै 2012 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ॲलोपॅथीमध्ये 51 लाख 90 हजार उपचार आणि 10 हजार 330 कोटी रुपये रुग्णांना अदा करण्यात आले आहेत.
एकत्रित योजनेमध्ये रुग्णांना गंभीर, गुंतागुंतीच्या आणि तातडीच्या आजारांवर उपचार करुन रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या हेतूने 34 विशेषज्ञ सेवांमध्ये द्वितीय आणि तृतीय स्तराचे वैद्यकीय उपचार आणि विविध शस्त्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला आहे. एकत्रित योजनेमध्ये ॲलोपॅथी उपचारांचा समावेश करण्याबाबत निर्णय राज्य शासनमार्फत घेण्यात आला असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.