मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी शिंदे-फडणवीस दिल्लीत! अजित पवार मात्र…

मुंबई: Maratha Reservation: मराठा आरक्षणावर कशा प्रकारे तोडगा काढता येईल,याची चाचपणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून, हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते.सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेली मराठा आरक्षणाबद्दलची फेरविचार याचिका त्वरेने विचारात घ्या, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करता येईल काय, याबद्दल बुधवारी दिल्लीत चाचपणी केल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षण प्रश्नी राज्यातील मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत.सरकारने मनोज जरांगे यांना दिलेली ४० दिवसांची मुदत परवा संपली .त्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा आंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे.याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या गावात मराठा समाज बांधवांकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचे निश्चित कारण समजले नसले तरी महाराष्ट्र सरकार फेरविचार याचिकेची लवकरात लवकर सुनावणी कशी घेता येईल,यासाठी प्रयत्नशील आहे.राज्याचे महाधिवक्ता विनोदकुमार सराफ यांनी दिल्लीत या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेता येईल का, हे तपासून पाहिले असल्याचेही विश्वसनीयरीत्या समजते. मराठा नेते मनोज जरांगे यांनीही दिल्लीला गेला आहात तर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूनच या,असे आवाहन या दोन नेत्यांना केले आहे.

अजित पवार मुंबईतच …

दरम्यान, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला न जाता महाराष्ट्रातच आहेत.त्यांना शहा यांनी दिल्लीला बोलावले नाही,अशी माहिती आहे. याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता, “याबाबत मला काही माहिती नाही.मी आताच पुण्यावरून मुंबईत आलोय.”असे ते म्हणाले.

Leave a Reply