महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र यादीत कोश्यारींचा समावेश असल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे. मुंबईमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी कोश्यारींच्या निवडीवरुन राऊतांना सुनावलं.
राऊत काय म्हणाले?
संजय राऊतांनी महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते अशी टीका कोश्यारींचा पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश असल्यावरुन केली आहे. “महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
फडणवीस काय म्हणाले?
सन 1944 मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणणलेल्या आणि मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आलेल्या ‘टर्न टेबल शिडी’या ऐतिहासिक वाहनाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महापालिकेच्या आवारात झाले. यावेळेस पत्रकारांनी कोश्यारींच्या निवडीवरुन राऊतांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारला. त्यावरुन कोश्यारींच्या निवडीवरुन त्यांनी राऊतांना टोला लगावला. कोश्यारींना पुरस्कार का देण्यात आला? त्यांचं कार्य काय आहे हे सुद्धा फडणवीसांनी सांगितलं आहे. “कोशयारी यांचे जीवन प्रगल्भ आहे. त्यांचे मोठे कार्य म्हणजे वन रँक वन पेन्शन आहे. पहाडी भागात त्यांचे मोठे काम आहे. टीका करणारे छोट्या मनाचे लोक असल्याने ते विरोध करीत आहेत. कोणाच्या काळात कोणाला आणि कसे गौरविले, हे आता बोलणे योग्य नाही,” असा खोचक टोला फडणवीसांना लगावल्याचं पाहायला मिळालं.
शिंदे काय म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोश्यारींच्या निवडीवरुन आनंद व्यक्त केला आहे. “वेगवेगळ्या क्षेत्रांतील आपल्या असामान्य कर्तृत्वाचे आदर्श देशासमोर ठेवणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वांना भारत सरकारतर्फे गौरविण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील थोर अभिनेते-कलावंत धर्मेंद्र यांना मृत्युपश्चात पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करून केंद्र सरकारने त्यांच्या कलाक्षेत्रातील महान योगदानाचा यथोचित गौरव केला आहे,” असं शिंदेंनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाल्यानंतर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.