शिर्डी, दि. 26 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले.