समाजातून होतेय कौतुक
चौंडी (अहील्यानगर) : २०१४ नंतर पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर आंदोलन, उपोषणे, मोर्चे , रास्ता रोको सुरु आहेत. अहील्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील चौंडी गावातही मागील 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो धनगर बांधव चौंडीत दाखल होत आहे. अशातच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट नव वधू-वराची उपस्थिती आंदोलनस्थळी पाहायला मिळाली. विवाहानंतर देवदर्शना किंवा हनिमूनला न जाता आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे नव दाम्पत्य थेट चौंडीत पोहचलं.
२०१४ मध्ये बारामती येथे आदिवासी जमाती चे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी मोठे आंदोलन केले होते. सदर आंदोलनाची तत्कालीन राज्यकर्ते काँग्रेस व राष्ट्रवादी ने दखल घेतली नाही. तेंव्हा विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणीस यांनी भाजप सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिले जाईल, असा लेखी विश्वास दिला होता. त्यामुळे सदर आंदोलन थांबवण्यात आले होते. परंतु भाजप सरकार येऊनही अद्याप धनगर समाज आरक्षण न मिळाल्याने धनगर समाजाने निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.धनगर आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन (Protest) सुरु आहेत. अहील्यानगर जिल्ह्यातील चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी एका नवदांपत्याने भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला आहे. प्रतीक्षा आणि हरीश खरात यांनी थेट लग्न मंडपातून आंदोलनस्थळ गाठले. येणाऱ्या पिढीसाठी धनगर आरक्षण महत्वाचे असून, देवदर्शनाला जाण्याआधी आम्ही आंदोलनस्थळी आलो असून या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. हे नवदाम्पत्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, चौंडी येथील आंदोलनाला पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे यांनी भेट देत पाठींबा दिला आहे. हे उपोषण कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी सुरू आहे. आता समाजाचा रोष वाढत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा, मी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र कोणतेही सरकार असले तरीही धनगर बांधवांना हक्काच्या आरक्षणासाठी संघर्षच करावा लागतो, असे मत विकास महात्मे यांनी व्यक्त केले आहे.
ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांचा पाठिंबा
या उपोषण आंदोलनाला राज्यातील वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांकडून पाठींबा मिळत आहेत. ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील या उपोषणाला पाठींबा दिला आहे. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. धनगर बांधवांना ठोस आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि या आंदोलनाला ओबीसी समाजाच्या सर्वच संघटनांचा पाठींबा राहील, अशी भूमिका सानप यांनी व्यक्त केली आहे.