PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू; २१,००० जागा आणि ९००० रुपये विद्यावेतन

देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कॉर्पोरेट जगात कामाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६’ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली असून, देशभरातील २१,७०० हून अधिक रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या इंटर्नशिप काळात निवडलेल्या उमेदवारांना दरमहा किमान ९,००० रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाणार आहे.

२० हून अधिक क्षेत्रांत संधी

ही योजना केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसून, यात वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध आहेत. आयटी (IT), आरोग्यसेवा (Healthcare), रिटेल, उत्पादन (Manufacturing), लॉजिस्टिक्स आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या २० हून अधिक क्षेत्रांमधील नामांकित कंपन्यांनी या पोर्टलवर आपल्या गरजा नोंदवल्या आहेत. सध्या ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३८० हून अधिक जिल्ह्यांमध्ये या संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात किंवा जवळच्या शहरात काम करण्याची संधी मिळेल.

पात्रता आणि निवड प्रक्रिया

योजनेचा लाभ अधिकाधिक तरुणांना घेता यावा, यासाठी सरकारने पात्रतेचे सहा वेगवेगळे स्तर निश्चित केले आहेत. यामध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण ते पदवीधर आणि डिप्लोमा धारकांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि आवडीच्या क्षेत्रानुसार (उदा. कंपनीचे नाव किंवा कामाचे ठिकाण) फिल्टर लावून योग्य इंटर्नशिप शोधू शकतात.
कौशल्य विकास आणि रोजगाराची हमी

या योजनेचा मुख्य उद्देश केवळ आर्थिक मदत करणे नसून, तरुणांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (On-job Training) प्रशिक्षित करणे हा आहे. निवडलेल्या उमेदवारांना मोठ्या कंपन्यांमधील रिअल-टाइम प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढण्यासोबतच सांघिक कार्य (Teamwork), वेळेचे नियोजन आणि व्यावसायिक शिष्टाचार यांसारखी महत्त्वाची कौशल्ये विकसित होतील.

प्रमाणपत्र आणि भविष्यातील फायदे

इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, प्रत्येक उमेदवाराला कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) आणि संबंधित कंपनीद्वारे संयुक्तपणे एक डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. हे प्रमाणपत्र ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित आणि सुरक्षित असेल, जे उमेदवारांच्या भविष्यातील करिअरसाठी आणि कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल.
अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. पोर्टलवर नियमितपणे नवीन जागांची भर पडत असल्याने, उमेदवारांना सातत्याने वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply