पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२ वा हप्ता होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात हप्ता जमा होऊ शकतो.
मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार १४० शेतकऱ्यांसह राज्यातील एक लाख ७२ हजार ३४८ शेतकऱ्यांनी बँक खाती आधारशी लिंक केलेली नाहीत. या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २२ वा हप्ता जमा होणार नाही.
शेतकऱ्यांनी बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे, अन्यथा पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी विभागाकडील माहितीनुसार सहा फेब्रुवारीपर्यंत देशभरातील ३० लाख १८ हजार ३६१ शेतकऱ्यांनी त्यांची बँक खाती आधारशी लिंक केलेली नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या राज्यवार यादीनुसार महाराष्ट्रातील एक लाख ७२ हजार ३४८ शेतकऱ्यांनी त्यांची बँक खाती आधार लिंक केलेले नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार १४० शेतकऱ्यांचा समावेश आहे.
चालु महिन्यात हप्ता जमा होणार?
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजारांची मदत दिली जाते. ही मदत प्रत्येकी दोन हजारांच्या तीन हप्त्यात डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी देण्यात आली होती. या योजनेंतर्गत चार – चार महिन्यांच्या अंतराने हप्ता जमा केला जातो. त्यानुसार आतापर्यंत त्याप्रकारे हप्ते जमा झाले आहेत. त्यामुळे चालु फेब्रुवारी महिन्यात २२ वा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र, अद्याप तारीख जाहीर झाले नसले तरी गतवर्षी २०२४ मध्ये २८ फेब्रुवारीला योजनेचा १६ वा हप्ता शेतऱ्यांच्या खात्यांवर जमा झाला होता.
बँक खाते आधारशी कसे लिंक कराल?
बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी शेतकरी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती वापरू शकतात.
ऑफलाइन पद्धत
आपल्या बँकेच्या शाखेला भेट देऊन आधार कार्ड व बँक खाते तपशील म्हणजे पासबुक दाखवा. बँकेने दिलेला आधार लिंकिंग फॉर्म भरा आणि तो दाखल करा. काही बँका एसएमएस किंवा एटीएमद्वारेही आधार लिंकिंग देतात. आधार लिंक करणे अनिवार्य नसले तरी सरकारी अनुदाने किंवा थेट लाभ आपल्या खात्यात मिळणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पद्धत
बँकेच्या नेटबँकिंग संकेतस्थळावर लॉग इन करा. तेथे आधार सीडिंग किंवा आधार अपडेट करण्याचा पर्याय मिळेल. बँकेच्या मोबाइल ॲपवर लॉग इन करा आणि आधार लिंकिंग पर्याय निवडा. काही बँका युआयडीएआय पोर्टलद्वारेही लिंकिंग देतात.