‘कुसुम’ ने आणूया पाणी, शेतं पिकवू सोन्यावाणी!

सोलार पंप योजनेचे अर्ज सुरू …

दृष्टिक्षेपात पीएम कुसूम योजना:

PM-kusum solar pump scheme

 

✅ शेतकऱ्यांना 90 व 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंपांचे वाटप.

✅ दरवर्षी 1 लाख नग या प्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 5 लक्ष सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.

✅ महाऊर्जामार्फत नव्याने अर्ज भरण्यासाठी 17 मे पासून संकेतस्थळ सुरु.

✅राज्यभरातून आतापर्यंत 23 हजार 584 अर्ज प्राप्त.

✅ आवश्यकते नुसार 3 एच.पी / 5 एच.पी / 7.5 एच.पी सौरकृषिपंपाचे वाटप करणार.

 

विज टंचाईमुळे दिवसा भारनियमन करावे लागते. परिणामी शेतकरी बंधूंना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. रात्री अपरात्री पाणी देताना साप,विंचू, जंगली प्राणी या शिवाय चोर- दरोडेखोर आदीं ची भीती असते. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका झालेला आहे. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होवून शासनाच्या पारंपरिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणारा खर्च तसेच सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीसाठी राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्यानुसार केंद्राकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत सोलर पंप मिळवण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा…

 

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि. २२ जुलै, २०१९ रोजी पीएम-कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. राज्य शासनाने १२ मे, २०२१ रोजी या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला असून या योजनेतंर्गत दरवर्षी १ लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ६ लक्ष सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.

 

असा असेल लाभार्थी हिस्सा-

पीएम कुसूम योजनेतंर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध होणार आहेत. आनॅलाईन पोर्टल सुरू झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३६ अर्ज प्राप्त झाले आहेत.

 

पीएम कुसूम योजनेतंर्गत ३ एच.पी. पंपासाठी पंपाची किंमत जीएसटी सह १ लाख ९३ हजार ८०३ असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० टक्के लाभार्थी हिस्सा १९ हजार ३८०,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा ९ हजार ६९० इतका राहील.

 

5 एच.पी पंपासाठी पंपाची किंमत जीएसटी सह 2 लाख 69 हजार 746 असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा 26 हजार 975 ,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा 13 हजार 488 इतका राहील.

 

7.5 एच.पी. पंपासाठी पंपाची किंमत जीएसटी सह 3 लाख 74 हजार 402 असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा 37 हजार 440 ,अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा 18 हजार 720 इतका राहील.

 

अशी आहे पीएम कुसूम- ब योजनेसाठी पात्रता-

PM-kusum solar pump scheme

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील. 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप. 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतक-यास 7.5अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 रोजी घोषीत करण्यात आलेल्या धोरणातील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचे वाटप देय राहील.

 

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महाऊर्जाद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना २ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेंतर्गत महावितरण कंपनीकडे अर्ज केलेले पात्र परंतु सौर कृषीपंप वाटप न झालेले लाभार्थी या अभियानांतर्गत पात्र राहतील.

ज्या शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या सौर कृषीपंपाची आवश्यकता आहे असे शेतकरी 7.5 अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेचा कृषीपंप आस्थापित करु शकतात. परंतु ते 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या सौर कृषीपंपासाठी देय असलेल्या अनुदानास पात्र असतील. उर्वरीत अधिकची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहील. सौर कृषीपंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलरचा वापर करता येईल. मात्र त्यासाठीचा खर्च संबंधित लाभार्थ्यांने करणे आवश्यक असेल.

 

सौर कृषिपंप आस्थापनेचे उद्दिष्ट, पीएम-कुसुम योजनेच्या शासन निर्णयातील नमूद तरतूद, जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्ण करावयाचे आहे. महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकारण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महाऊर्जा मार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु केल्यानंतर त्यास प्रचंड प्रतिसाद प्राप्त असून एकाच वेळी असंख्य शेतकरी अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रक्रिया होण्यास विलंब होत असून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा. अर्जासाठी महाऊर्जाच्या

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. या योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा http://www.mahaurja.com

संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करु नये. महाऊर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी 020-35000456 / 020-35000457 या दूरध्वनी क्रमांकावर आपण तक्रार नोंदवू शकता.

वाचक शेतकरी बंधू-भगिनींनो… वरील माहिती आपणास आवडली असल्यास आपले मित्र, नातेवाईक व आपल्या गावातील ग्रुप वर शेअर करण्यास विसरू नका! सरकारी योजना, जॉब अलर्ट व बातमी मागील बातमी जाणून घेण्यासाठी वाचत रहा महा जागरण… डेली अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा!

Tag: #Maha Jagran #mahajagran #महा_जागरण बातमी नव्हे तथ्य!

Leave a Reply