विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे – नरेंद्र मोदी

मुंबई : देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

विकसित भारत @२०४७च्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सार्वजनिक, खाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्याशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

महाराष्ट्रात राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत@२०४७ च्या संकल्पनांवर विचार-विमर्श करण्यासाठी राजभवन येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, खाजगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठांचे  कुलगुरू, प्र-कुलगुरु, शैक्षणिक संस्था प्रमुख उपस्थित होते.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या उभारणीत  ‘विकसित भारत@२०४७’ यामध्ये ‘व्हॉइस ऑफ यूथ’ (Viksit Bharat@2047: Voice of Youth) हे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) उपलब्ध करुन दिले आहे. विकसित भारत संकल्पनेवर सामूहिक विचार करण्यासाठी हा मंच उपलब्ध आहे. युवाशक्तीमध्ये विचारांची विविधता असून या उपक्रमाचा उद्देश विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी एकत्रित असणे गरजेचे आहे. यामुळेच या उपक्रमात  युवकांनी मोठ्या संख्येने  सहभागी व्हावे, आणि विकसित भारतासाठी आपले योगदान द्यावे.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, आपले ध्येय,संकल्प विकसित भारतासाठी असले पाहिजे, याद्वारे सुसंस्कारित, बुद्धिमान, अशी युवा पिढी तयार होईल आणि आगामी काळात देशाचे नेतृत्व करेल, देशाला योग्य दिशा देईल. डिजिटल इंडिया, स्वच्छता अभियान यासह कोरोना काळ आपण पहिला आहे. युवा शक्तीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे. देश उत्तुंग भरारी घेत आहे. अनेक देशांनी योग्य वेळेत जलद बदल करुन त्या ठराविक कालावधीत देशाचा विकास केला आहे.  भारतासाठीसुद्धा आता हीच योग्य वेळ आहे.  अमृत काळाच्या प्रत्येक क्षणी आपल्यापुढे भारताला विकसित देश म्हणून उभे करण्याचाच ध्यास असला पाहिजे. असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply