“जग अत्यंत धोकादायक वळणावर”; मेट्रोवरून अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा भारताला धोक्याचा इशारा

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. “जग सध्या अत्यंत कठीण आणि धोकादायक कालखंडातून जात आहे,” असे म्हणत त्यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या सुधारणांची अपेक्षा व्यक्त केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केवळ तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून बजेट सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

भारताने आपल्या विकास प्रवासात चीनने केलेल्या चुका टाळाव्यात, असा सल्ला राजन यांनी दिला. चीनमधील रिअल इस्टेट मार्केट ज्या प्रकारे कोसळले आहे, त्यातून भारताने धडा घ्यावा. “अव्यावहारिक पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनावश्यक गुंतवणूक करणे टाळावे. प्रत्येक शहराला मेट्रो हवी आहे, पण तिथे मेट्रो चालवण्याची क्षमता आहे का? लोक त्याचा वापर करतील का? याचा विचार होणे गरजेचे आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

शेजारील देशांशी संबंध सुधारा
राजन यांनी भारताच्या जागतिक स्थानावर भाष्य करताना सांगितले की, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांसारख्या शेजारील देशांशी आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची गरज आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारताला जर स्वतःचे स्थान निर्माण करायचे असेल, तर मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्र या दोन्ही आघाड्यांवर विस्तार करावा लागेल.

AI मधील गुंतवणुकीबाबत सावधगिरी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये गुंतवणुकीच्या संधी रोमांचक असल्या तरी त्यात मोठे धोकेही दडलेले आहेत. भारताने अशा संस्थांवर जास्त अवलंबून राहू नये ज्या भविष्यात आपल्याला कमकुवत करू शकतात. आपण अधिक स्वावलंबी आणि लवचिक अर्थव्यवस्था बनण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून जगातील इतर देशांना भारताशी मैत्री करावीशी वाटेल.

Leave a Reply