राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

 

नवी दिल्ली ; वृत्तसेवा : महाराष्ट्र विधीमंडळाच्या आमदारांसाठी उद्या, (मंगळवार) ५ तसेच ६ एप्रिल रोजी दोन दिवसीय संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संसद आवारात स्थित असलेल्या पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनींग इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी (प्राईड) मध्ये मंगळवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ,अनिल परब, आदिती तटकरे, प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी कार्यक्रमात उपस्थित राहतील.

महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसह एकूण ११० आमदारांनी नोंदणी केली आहे.

उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे सभापती एम.व्यंकय्या नायडू, उपसभापती हरिवंश नारायण सिंह, महाराष्ट्र विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहतील. संसदीय कामकाज, संसदीय समित्या, प्रश्नोत्तरांचा तास तसेच इतर संसदीय कामकाजाचे महत्व आदी विविध विषयांवर आमदारांना लोकसभा, राज्यसभेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री व जेष्ठ खासदारांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Source link

Leave a Reply