कांद्याने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी!
मुंबई (प्रतिनिधी): लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा मरू नये असे म्हटले जात असले तरी जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची नेहमीच आबाळ होत आलेली आहे. अतिवृष्टी, दुष्काळ,नापिकी,कीड आदी संकटांना शेतकऱ्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. मात्र शेतमालाला रास्त भाव न मिळणे ही भारतभरातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या आहे.
उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याबाबत चर्चा होतात परंतु याची अद्याप अमोल बजावणी न झाल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल बेभाव विकावा लागतो. याचे एक ताजे उदाहरण कर्नाटकम मध्ये घडले आहे. उत्तर कर्नाटकमधील एका शेतकऱ्याने तब्बल २०५ किलो कांदे विकल्यानंतर फक्त वाहतूक, तोलई, आडत खर्च वजा करून त्याला शेवटी फक्त ८ रुपये शिल्लक राहिले आहेत. शेतकऱ्याशी घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
उत्तर कर्नाटकमधील गडाग या भागातील पवडेप्पा हालिकेरी यांनी बंगळुरू येथील यशवंतपूर बाजारात २०५ किलो कांद्याची विक्री करण्यासाठी तब्बल ४१५ किमीचा प्रवास करून आले. परंतु येथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. मोठा खर्च करून पिकवलेला दोन क्विंटल कांदा विकून या शेतकऱ्याच्या हातात शेवटी फक्त ८.३६ रुपये शिल्लक राहिले. या व्यवहाराची पावती सध्या समाजमाध्यांवर व्हायरल होत आहे.
या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये भाव मिळाला. त्यात मालवाहतुकीचे ३७७ रुपये कापण्यात आले. त्यानंतर हमालीचे २४ रुपये कापण्यात आले. शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त ८.३६ रुपये शिल्लक राहिले. या शेतकऱ्याने इंटरनेटवर आपली व्यथा मांडली आहे. त्याने यापुढे आपला शेतमाल विकण्यासाठी बंगळुरू येथे येऊ नका, असे आवाहान अन्य शेतकऱ्यांना केले आहे.
This is how The double engine Govt of @narendramodi & @BSBommai doubling the income of farmers (Adani)
Gadag farmer travels 415 km to Bengaluru to sell onions, gets Rs 8.36 for 205 kg! pic.twitter.com/NmmdQhAJhv
— Arjun (@arjundsage1) November 28, 2022
पोस्ट व्हायरल झाल्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर कर्नाटकला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. कांदा व इतर पिकांनाही मोठा फटका बसला होता. अतिवृष्टी, दुष्काळ, बोगस बियाणे, कीड इत्यादी कारणामुळे होणारी शेतकऱ्यांची परवड अद्याप कोणत्याही सरकारला रोखता आलेली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर शेतकरी संघटनांचे नेते मोठे झाले शेतकरी मात्र अद्याप जागेवरच आहेत. शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी गेल्या 70 वर्षात शेतीकडे कमालीचे दुर्लक्ष झाले असे खेदाने म्हणावे लागते. शेती क्षेत्राकडे झालेल्या दुर्लक्ष मुळे त्या संबंधित अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत.