ह
हिवाळी अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. महापुरुषांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य, कर्नाटक सीमावादासह विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची सुरुवात देखील विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत केली आहे. दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. अर्थात त्यांच्या सोबतील नागपूरकर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील असणार आहेत. मात्र अजित पवारांसारखा विरोधी पक्ष नेता आणि सोबतीला राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेससारखे तगडे विरोधक समोर असणार आहेत. नागपुरात (Nagpur) पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
राजकीय घमासान एकीकडं होणार असलं तरी जनतेच्या हितावर देखील चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. जनतेच्या हिताचे निर्णय या अधिवेशनात घेतले जातील अशी देखील अपेक्षा सामान्य जनता ठेवून आहे. सरकारकडून 23 विधेयके प्रस्तावित आहेत. तर 5 अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. 23 अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त 12 विधेयकं आहेत तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष 11 विधेयकं आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 मान्यतेसाठी मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
याशिवाय खालील महत्वाची विधेयकं देखील मांडण्यात येणार आहेत.
1. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग),
2. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, 2022 ( सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग).
3. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 12 चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग).
4. विधानसभा विधेयक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 , (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
5. विधानसभा विधेयक- . जे.एस.पी.एम. युनिव्हर्सिटी विधेयक, 2022 ( नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग).
6. महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा ( विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 ( शिक्षेची तरतूद कमी करण्याबाबत) (गृह विभाग).
7. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र औद्योगिक संबंध, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण), महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक, 2022 (मुख्य अधिनियमातील तुरंगवासाच्या तरतुदीऐवजी दंडाची तरतूद वाढविण्याकरिता) (उद्योग, ऊर्जा व कामगार).
8. विधानपरिषद विधेयक – युनिवर्सल ए. आय. विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).
9. विधानपरिषद विधेयक – पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).
10. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग).
11. विधानसभा विधेयक – उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे(सुधारणा) विधेयक, 2022 (नगर विकास विभाग)
12. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग).
पटलावर ठेवायचे अध्यादेश
1. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (तिसरी सुधारणा) अध्यादेश, 2022 (ग्रामविकास विभाग)
2. महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश, 2022 (आकस्मिकता निधीमध्ये तात्पुरती वाढ करणेबाबत) (वित्त विभाग)
3. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा अध्यादेश, 2022 ( शेतकऱ्यांना निवडणुकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग).
4. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, 2022 ( इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग).
5 . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2022( विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतुदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).