पुणे | पवन मोगरेकर
हल्ली भाजपच्या मंडळींना सत्तेचा हर्षवायु झालेला दिसतो कारण विरोधी पक्षातून अचानक, भयानक प्रकारे ही मंडळी सत्तेत दाखल झाली; सत्तेत येताच भाजपच्या मंडळींचा जिभेवरील ताबा पुरता गेल्याचे दिसून येत आहे. विनाशाची सुरुवात वाणी वरील ताबा सुटण्यापासून होते; हे वाचाळवीरांच्या या टीमला कोणीतरी सांगायला हवे.
२०१४ मधील सरकारमध्ये महसूल सारखे अत्यंत महत्वाचे खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले होते.सध्याच्या शिंदे फडणवीस सरकार मध्ये मात्र त्यांना त्या तुलनेत कमी महत्वाचे खाते देण्यात आले आहे. ही एक प्रकारे त्यांची राजकीय पदावनतीच आहे असे म्हणावे लागेल.ही खदखद तर त्यांना अशी वादग्रस्त विधाने करायला प्रवृत्त करत नाही ना? अशी शंका घ्यायला वाव आहे.
लाडाचा प्रसाद,अखंड कोशियारी, दानवे एक्सप्रेस, आणि सर्वांचे आवडते निरागस चेहऱ्याचे चंद्रकांत पाटील या मंडळींनी भाजपला पुरते अडचणीत आणले असून चंद्रकांत दादांच्या भिकेच्या विधानामुळे तर भाजपला त्यांनी दिवसाच तारे दाखवले आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वीपासून शरद पवारांचा राजकीय फॉर्म गेला होता परंतु भाजपच्या या महान प्रवक्त्यांनी शरद पवारांना त्यांच्या आवडीची लेंथ टाकली असून भाजपचे प्रवक्ते वारंवार नो बॉल टाकत असल्याने साहजिकच त्यांनी शरद पवारांना पुढील दोन वर्षांची राजकीय तरतूदच करून दिली आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
लाडांचा प्रसाद, दानवे एक्सप्रेस किंवा ईतर छोटया मोठ्या नेत्याने बोललेले एकवेळ लोक विसरूनही जातात परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत वाढलेल्या चंद्रकांत दादाने या प्रकारची भाषा वापरणे हे खरंच क्लेशदायक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असो या मंडळींनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागितली हे वाक्य कुणाला पटेल? संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही समाजातील सज्जन शक्तीला सक्रिय करून देशात शेकडो प्रकल्प उभारले आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिरही याच प्रकारे निधी संकलन करून उभारण्यात येत आहे याची जाणीव चंद्रकांत दादां सारख्या केडर बेस कार्यकर्त्याला असायला हवी परंतु दुर्दैवाने वारंवार भाजप मधील काही मंडळी समाजाची ग्राउंड रिआलिटी विसरत चालल्याचे दिसून येत असून याचा चांगलाच फटका भाजपला महाराष्ट्रात बसण्याआधी भाजपने सर्व प्रवक्त्यांची व नेत्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना भाषेची मर्यादा शिकवायला हवी.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पैठण इथं एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हतं. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात.
शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलेलं नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.
पाटील पुढे म्हणाले, ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे”
आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली
शाळांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुलेंनी (Mhatma Phule) भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. त्यानंतर राज्यभरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मला कोणी शिकवण्याची गरज नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“झोपलेल्या जागे करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्या जागे करता येत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मी हार घालावा यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी आले होते. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांच्या एकूण चिंतनामधील मी जेवढं वाचलंय तेवढं ज्यांनी वाचलं आहे त्यांनी माझ्या समोर चर्चेला यावे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्याबद्दलचा आदर मला कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. तो माझ्या मनामध्ये आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“बाबासाहेबांनी शिका आणि संघटीत व्हा ही घोषणा दिली नसती तर फार मोठ्या प्रमाणात वर्ग अशिक्षित राहिला असता. मी वर्गणी म्हणायला हवं होतं असे ते म्हणत असतील तर त्याकाळात तसे शब्द नव्हते. त्या काळात भीक मागून मी संस्था उभी केली असे म्हटले जायचे. तरीही भीक शब्दाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
विरोधक शब्दाचा फक्त अर्थ समोर घेऊन विरोध करत आहेत त्या मागचा भावार्थ ही लक्षात घ्यायला हवा असं जनतेमधून म्हणले जाते.