🔴छत्रपती संभाजीनगर-
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २२० रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी सेवा अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या ३२ जागा, अग्निशमन सेवा अंतर्गत उपअग्निशमन केंद्र अधिकारी पदाच्या ४ जागा, सहाय्यक सुरक्षा अधिकारी १ पद, तांत्रिक सेवेतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि अतिक्रमण निरीक्षक पदाच्या २४ जागा तसेच स्वच्छता निरीक्षक पदाच्या १२ जागांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त पशुधन पर्यवेक्षक ७ पदे, चालक-यंत्रचालक १५ पदे, उद्यान सहाय्यक किंवा कृषि सहाय्यक ६ पदे, अनुरेखक ९ पदे आणि अग्निशामक पदाच्या सर्वाधिक १०० जागा भरल्या जाणार आहेत. तसेच लेखा व लेखा परीक्षण सेवेतील रोखपाल पदाच्या १२ जागांसाठी देखील ही भरती होत आहे. या सर्व पदांसाठी ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून पदनिहाय वेतनस्तर निश्चित करण्यात आले आहेत. शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांनी www.chhsambhajinagarmc.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भरतीमुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होणार असून बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.