पुणे | डी.अशोक
देशात २०१४ ला मोदी युग सुरु झाल्यापासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. एक एक राज्य काँग्रेसच्या हातून निसटून जात आहे.खासदार,आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था चे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाला सोडुन जात आहेत.काँग्रेसची ही दयनीय अवस्था दुर व्हावी व पक्षाला पुन्हा एकदा गतवैभव मिळावे, यासाठी काँग्रेसने केलेल्या युक्तीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून आश्चर्य व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्ष एक पुरोगामी, धर्मनिरेक्ष पक्ष असल्याचा दावा केला जातो.मागासवर्गीय,मुस्लिम,आदिवासी ही काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक राहिली आहे.या व्होट बँकेला चुचकारण्यासाठी काँग्रेसने नेहमीच देशात बहुसंख्य असलेल्या हिंदु धर्मियांचा तिरस्कार केला.हिंदु धर्म, देव देवता,अस्मिता, प्रतीके यांचा जाणीवपूर्वक अनादर करण्याची संधी काँग्रेसने आजवर कधीही सोडली नाही. एवढेच नव्हे तर रामायण, महाभारत हे काल्पनिक ग्रंथ आहेत, अशी मुक्ताफळे उधळली. अयोध्येतील राम मंदिर लढ्यात मुस्लिम पक्षाची बाजू घेतली. देवालाही कोर्टात खेचले! ‘धर्मनिरपक्षता म्हणजे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि बहुसंख्यांक असणाऱ्या हिंदूंचा तिरस्कार’ अशी व्याख्याच काँग्रेसने बनवली होती.कारण देशातील बहुसंख्य हिंदु समाज हा शेकडो जातीत विभागलेला आहे.काँग्रेसच्या ७० वर्षांच्या काळात त्याने कधीच हिंदु म्हणून मत दिले नाही.काँग्रेसनेही या कमजोरीचा फायदा उठवण्यासाठी हिंदु मतांमध्ये जास्तीत जास्त कशी फूट पडेल याची पुरेपूर काळजी घेतली.परंतु, २०१४ ला राजकारणाच्या राष्ट्रीय पटलावर नरेन्द्र मोदी यांचा उदय झाला अन् देशाच्या राजकारणाने एक नवे वळण घेतले.२०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकीत मोदींनी काँगेस व विरोधकांना असा राजकीय तडाखा दिला की विरोधकांना अद्याप ही या तडाख्यातून सावरता आलेले नाही. मोदींनी देव,देश,धर्म,संस्कृती या गोष्टींना प्रोत्साहन देत हिंदुंच्या मनावरील नैराश्य, न्यूनगंडाचे मळभ हटवून त्यांच्यात नव चैतन्य फुंकले. हिंदु समाज आता हिंदु म्हणुन हिंदुत्ववादी पक्षाला मत देऊ लागला आहे. दुसरीकडे मागास वर्गीय, मुस्लिम,आदिवासी ही काँग्रेसची हक्काची व्होट बँक अनेक प्रादेशिक पक्षांनी पळवली आहे. त्यामुळे काँग्रेस आता केवळ नावापुरता राष्ट्रीय पक्ष राहिलाय.काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था पहिल्यांदाच होतेय. लोकसभे बरोबरच अनेक राज्यातील विधिमंडळात काँग्रेसला विरोधी पक्ष नेता करता येईल एवढी सुद्धा सदस्य संख्या मिळालेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव काँग्रेसला आपल्या भूमिकेत बदल करून सॉफ्ट हिंदुत्व स्विकारावे लागले. पूर्वी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ दर्ग्यात चादर चढवून होत असे.आता काँग्रेसवाले राहूल गांधी, प्रियंका गांधी हनुमानाची आरती करुन प्रचाराला निघतात. मठ, मंदिरात दर्शन घेतात. गंगा आरती करतात. काँगेसच्या या नव्या भूमिकेमुळे पारंपरिक मतदार दुरावत आहे.आणि हिंदुत्ववादी मतदार या नाटकाला पुरता ओळखून असल्याने काँग्रेसची अवस्था ‘धरलं तर चावतयं अन् सोडलं तर पळतयं’ अशी झाली आहे.काँग्रेसची कधी नव्हे एवढी राजकीय फरफट भाजप व मोदींमुळे झाली आहे.
काँग्रेसला सोडून जाण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाला गतवैभव यावे, पक्षाची भरभराट व्हावी, सर्व विरोधकांत एकी व्हावी, यासाठी ‘सर्व सिद्धी’ पूजा करून होम-हवन करण्याची घटना पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये नुकतीच घडली आहे. काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांचा पक्ष समजला जातो, अशा पक्षाला पक्ष वाढीसाठी होम हवन का करावे लागले? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये रविवारी सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान अध्यक्षांच्या केबिनच्या शेजारील सभागृहात होम-हवन झाले. काँग्रेस पक्षाला गतवैभव यावे, पक्षाची भरभराट यावी, सर्व विरोधकांत एकी व्हावी, यासाठी ‘सर्व सिद्धी’ पूजा करून होम-हवन पुजेची विधी झाली. या विधींची तयारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरू होती. सर्व स्वच्छता करून दुपारी दीडच्या सुमारास त्या सभागृहाला कुलूप लावण्यात आले. काँग्रेस भवनमध्ये रविवारी कार्यकर्त्यांची वर्दळ कमी असते, हे लक्षात घेऊन त्यासाठी हा मुहूर्त निवडला, अशी चर्चा पक्ष वर्तुळात आहे. त्यामुळं एकीकडे धर्मनिरपेक्षता पक्ष असल्याच्या बाता मारायचा तर दुसरीकड पूजा करायचा, यामुळं पुण काँग्रेसवर टिका होत आहे.
पुण्यातील शिवाजीनगर मधील काँग्रेस भवनची स्थापना १९४० मध्ये झाली आहे. काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे, आणि केशवराव जेधे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. धर्मनिरपेक्षता, हे तत्व अंगीकारलेल्या काँग्रेस भवनमध्ये ८२ वर्षांत पहिल्यांदाच होम- हवन झाले आहे. या वाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “काँग्रेस पक्षाची भरभराट व्हावी, पक्षाचा सुवर्णकाळ पुन्हा यावा, या उद्देशाने कार्य सिद्धी पूजा केली. पण दुसरीकडे विरोधकांनी टिका केली आहे. पूजा केल्यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात असून, मोदी लाटेत काँग्रेस वाहवत चाललीय अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.