स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मविर नव्हते. त्यांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतेच केले. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला असतानाच आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी एका न्यूज चॅनेल ला मुलाखत देताना अजित पवार यांचीच री ओढली.यामुळे वारंवार समाजाच्या भावना दुखावण्याचे काम होत आहे.म्हणून संभाजीनगर येथील इतिहास अभ्यासक रवींद्र सासमकर यांनी इंद्रजित सावंत यांना अनावृत्त पत्र लिहून त्यांनी मांडलेल्या मताचे खालील मुद्द्यांच्या आधारे खंडन केले आहे.
इंद्रजित सावंत यांना जाहीर प्रश्न…
—————————————-
स्वघोषित इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी एका मुलाखतीत ‘छत्रपति शंभुराजे हे धर्मवीर नाहीत तर स्वराज्यरक्षक’ अशी भुमिका घेतली आहे.वास्तविक धर्मवीर हा शब्द स्वराज्यरक्षक या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द नाही. ते स्वराज्यरक्षक होतेच पण धर्मवीरही होते.
सावंतांची मुलाखत बघुन आमच्यासारख्या इतिहासाच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने काही प्रश्न आणि मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात, आशा आहे सावंतसाहेब त्याला उत्तर देतील.
1) जर मराठा राज्यकर्त्यांचा हिंदुधर्माशी संबंध नव्हता तर, वैदीक राज्याभिषेकाचा खटाटोप कशासाठी केला असेल?
3) सावंत यांच्या म्हणण्याचा आशय असा की हिंदुधर्म आणि शंभुराजे यांचा काहीही संबंध नाही. पण हे किती खोटे आहे ते पहा…सावंत यांनी समकालीन कागदपत्रे वाचलीच नसल्याचे दिसते.
A) इंग्रजांच्या राजापुर वखारीचा प्रमुख हेन्री रिव्हिंग्टन याने दि. 13 फेब्रुवारी 1660 रोजी छ. शिवाजीमहाराजांना जे पत्र लिहीलय, त्यात महाराजांना उद्देशून Generall of the Hindu Forces अर्थात “हिंदुसेनाधिपती” असा उल्लेख करण्यात आला आहे. (फॅक्टरी रेकॉर्ड राजापुर )
B) छत्रपति शंभूराजेंनी बाकरेशास्त्रींना जे दानपत्र दिले,त्यात आपल्या आजोबांचा उल्लेख ‘हिंदुधर्मजीर्णोध्दारक’ असा करतात.
C) छत्रपति शंभूराजे यांच्या गोव्याच्या शिलालेखात स्पष्टपणे ‘हिंदुराज्य’ असा शब्द आला आहे.
D) मराठा हा शब्द हिंदुधर्माच्या विपरीत नाही,राजपुत,मराठा,विजयनगरचे साळुव,तुळुव राज्ये असा उल्लेख होत असला तरी त्यांचा अर्थ हिंदुराज्यच होतो…..जसे महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे,तसा मराठा हा हिंदुधर्माचाच भाग आहे.
E) छत्रपति शिवाजीमहाराज आणि छत्रपति शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता,तर त्यांनी मंदिरे का बांधली? तिरुवन्नामलाई येथे मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडुन मशिदी बांधल्या होत्या,तिथे महाराजांनी शिव आणि समोरुत्तीपेरुमल अर्थात विष्णुमंदिराचे पुनर्निर्माण का केले? गोव्यात सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार का केला? शंभुराजांच्या मराठा आधिकार्यांनी नवलगुंदच्या मोकादमास पत्र लिहुन तेथील ग्रामदैवताचे मंदिर का बांधले? त्या पत्रात मराठा आधिकारी ही ‘हिंदुकीची गोष्ट’ सांगायला विसरलेले नाहीत.
F) छत्रपति शंभूराजांनी रामसिंगाला लिहीलेल्या संस्कृत पत्रात “आम्ही हिंदु काय सत्वशून्य झालो आहोत का?” असा उल्लेख केला आहे….याच पत्रात शंभुराजे श्रृती-स्मृतीचाही उल्लेख करतात.
बुधभूषण ग्रंथाची सुरुवात शंभुराजांनी श्रीगणेशाला वंदन करुन केली आहे, पुढे ते श्रीशिवपार्वती,श्रीभवानीमाता,
महिषासुरमर्दीनी, श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही वंदन करतात.
G) छत्रपति शंभूराजे बुधभूषणमध्ये लिहीतात,की धर्माला कलिकालरुपी भुजंगाने वेढा घातला तेव्हा जगदीश्वरांच्या अंशरुपाने श्रीशिवाजीराजे अवतीर्ण झाले!! इथे कोणता धर्म अपेक्षित आहे? हिंदुच ना?
जर इथे जर मराठाधर्म अपेक्षित असेल ,तर सावंतांनी हेही सांगावे,की मराठाधर्माचे संस्थापक कोण? त्यांचा ग्रंथ कोणता? त्यांच्या चालीरिती काय?
त्यांच्या देवी-देवता कोणत्या?
वरील सगळे समकालीन संदर्भ नमुन्यादाखल दिले आहेत,अजुनही देता येतील…..वरील पुराव्यावरुन शिवराय,शंभूराजे यांचा हिंदुत्वाशी किती प्रगाढ संबंध होता,हे लक्षात येईल.
आता काही आधुनिक संदर्भ पाहूया
1) राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासमितीतील शेवटच्या भाषणात म्हटले होते “शिवाजीमहाराज हिंदुच्या मुक्ततेसाठी लढत होते.”
( संदर्भ – 25 नोव्हे 1949 रोजी घटनासमितीतीत शेवटचे भाषण)
2) थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी शिवरायांवर जो पोवाडा लिहिला त्यात “युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा l रोविला झेंडा हिंदुचा ” असे स्पष्ट म्हटलेले आहे.
( संदर्भ – महात्मा फुले समग्र वाड्मय,महाराष्ट्र शासन)
सावंतसाहेब लक्षात घ्या, महात्मा फुले शिवरायांनी ‘हिंदुचा झेंडा’ रोवला म्हणतात.
3) कोल्हापूर पॅलेसजवळ राजर्षी शाहूमहाराजांचा पुतळा आहे,त्यावरील ताम्रपटावर ‘हिंदुपदपातशाह’ असे लिहीलेले आहे. करवीर छत्रपति आपल्या कोटावर जरीकामातील राजचिन्ह धारण करत त्यावरही ‘हिंदुपदपातशाह’ असाच उल्लेख आहे. या राजचिन्हाचा फोटो राजर्षी शाहु स्मारक ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या 1133 व्या पानावर डाॅ.जयसिंगराव पवारांनी छापला
आहे.
आपल्या देशात लोकशाही आहे,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या घटनेने दिले असले ,तरी हे स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नव्हे!! खंडन-मंडन ही लोकशाहीची परंपरा आहे,तिला अनुसरुन सावंतसाहेब आपल्या लेखावरील आक्षेपांचे समकालीन पुराव्यासह वैचारिक प्रतिवाद करतील अशी आशा आहे!!
– रवींद्र गणेश सासमकर, संभाजीनगर
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत)