कलावंतांनी महाराष्ट्रभूमी समृद्ध केली- बंडू खांडेकर

◾️वृद्ध कलाकारांना मासिक पाच हजार रुपये मानधन द्यावे

बीड,दि.6 (प्रतिनिधी):- सरकारच्या वतीने वृद्ध कलावंतांना देण्यात येणारे मानधन हे वाढत्या महागाईच्या दृष्टिकोनातून अतिशय कमी आहे. त्यात वाढ करून सरकारने महिना पाच हजार रुपये मानधन कलावंतांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी तेलगाव येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. संत महंत व शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्रभूमी इथल्या वारकरी व विविध कलावंतांनी समृद्ध केली असल्याचे प्रतिपादन पत्रकार बंडूजी खांडेकर यांनी केले.

धारूर तालुक्यातील तेलगाव येथे ह.भ.प.सर्जेराव महाराज काशीद यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ कलावंत व वारकऱ्यांचा व्यापक व जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. वृद्ध कलावंत समितीचे जिल्हा सदस्य मोटे नाना यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तर पत्रकार बंडूजी खांडेकर यांची विशेष उपस्थिती होती. मेळाव्यास ह.भ.प.भगवानराव म.कदम, ह.भ.प.परमेश्वर महाराज कुरे,भागवत महाराज शिंदे, बालासाहेब फपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील वृद्ध, कलावंत, मान्यवर, साहित्यिक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना बंडू खांडेकर म्हणाले की, सरकारच्या वतीने भजनी , किर्तनकार , गोंधळी, आराधी , तमाशा, साहित्यिक, गायक , वादक, कवी , लेखक अशा विविध कला क्षेत्रातील वृद्ध कलाकार, महिला, विधवा, दिव्यांग कलाकार यांना मानधन देण्यात येते. मात्र अद्याप पर्यंत या योजनेचा लाभ पात्र व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. महाराष्ट्राचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपण्याचे व तिला बळकटी देण्याचे काम इथल्या विविध घटकातील कलावंतांनी इमाने इतबारे केले असल्याचेही खांडेकर म्हणाले. मात्र हे कलावंत वृद्ध झाल्यानंतर सर्वार्थाने दुर्लक्षित होतात. त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्यांना मानधन मिळते त्यात वाढ करणे गरजेचे असून ज्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनाही या योजनेत समाविष्ट करून घ्यावे ही मागणी रास्त असल्याचेही खांडेकर म्हणाले.

समाजातील अनेक वृद्ध कलावंतांना शारीरिक व्याधींनी घेरलेले आहे. तरुणपणात त्यांनी भजन, गायन, कीर्तन, कथा या माध्यमातून जनतेचे प्रबोधन व मनोरंजन करून समाजाचे दुःख व वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या कलाकृतीतून लोकांना सुख- शांतीचा संदेश देऊन जगण्याची प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात तात्काळ वाढ करून कलावंतांना प्रति महिना 5000 रुपये मानधन देण्यात यावे. आशा मागणी चा ठराव सर्वानुमते मंजूर करून शासनाकडे पाठवण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.

या मेळाव्याचे संयोजक भागवताचार्य सर्जेराव महाराज काशीद म्हणाले की, पाच हजार रुपये मानधनाची मागणी पूर्ण होईपर्यंत सरकारकडे संविधानिक मार्गाने पाठपुरावा केला जाईल. बीड जिल्हा निवड समितीने सदर कलावंतांचे प्रस्ताव मंजूर करताना यापुढे तोंडी मुलाखत घेऊनच करावेत व पात्र कलावंतांचा त्यात समावेश करण्यात यावा असेही ते म्हणाले.

या मेळाव्यास परमेश्वर मोरे, लक्ष्मण शिंदे, देविदास मुठाळ, पंढरीनाथ डोंगरे, मधुकर डोंगरे, दिगंबर साठे, भीमराव महाराज, भागवत फपाळ, देविदास मुठाळ, राधाकिसन इके, भास्कर लगड, सुमंत लगड, भगवान सोळंके,अंकुश साबळे, देविदास मुंडे, हरिभाऊ खुळे आदी कलावंत उपस्थित होते. रामचंद्र दहीहंडे व मदन भंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply