अतिक्रमणावर बुलडोझर तर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील
माजलगाव, दि.३: शहरात मागील दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. सोबतच नगर परिषदचे परिविक्षाधीन मुख्याधिकारी IAS आदित्य जिवने यांनी मालमत्ता कर व नळपट्टी थकीत ठेवणाऱ्या थकबाकीदार मालमत्ता धारकाकडे मोर्चा वळवला आहे. त्यानुसार आज शहरातील अनेक थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या.
शहरातील मालमत्ता धारकांना वारंवार थकबाकी भरण्याबाबत नोटीस देऊन ही मालमत्ता कर व नळपट्टी भरण्यास शहरवासी तयार नाहीत. त्यामुळे परिविक्षाधीन मुख्याधिकारी IAS आदित्य जिवने यांनी थकबाकीदार मालमत्ताधारकांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. त्यानुसार आज (दि.३) बुधवारी शहरातील अनेक व्यापारी संकुल व दुकाने सिल करण्यात आली. या मोहीमेत कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे, चंद्रकांत बुलबुले, बाप्पू उजगरे, भगवान कांबळे, शंकर चव्हाण, सखाराम होके व सर्व वसुली कर्मचारी यांनी भाग घेतला.
मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करावा: डोंगरे
माजलगाव शहरातील मालमत्ता कर व नळपट्टी थकबाकीदारांनी तात्काळ नगर परिषदेकडे कराचा भरणा करावा. अन्यथा, उद्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे न. प.कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे यांनी सांगीतले आहे.
अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच
शहरातील मुख्य रस्त्यावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणाविरुद्ध दोन दिवसापासून सुरू असणारी कारवाई आजही सुरूच होती. अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर लावलेले डिजिटल बोर्ड,पाट्या,पत्र्याचे शेड व लोखंडी पायऱ्या जेसीबी यंत्राच्या साह्याने काढून टाकण्यात आले. शहरातील गेवराई रोड पासून ही कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली होती. कारवाईनंतर शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला व प्रथमच माजलगाव मोकळे मोकळे वाटू लागले आहे.
महा जागरण न्यूज पोर्टल maha Jagran