मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्यात आले असून, या अत्यंत महत्त्वाच्या समितीच्या सदस्यपदी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील श्री. प्रविण आत्माराम शेजुळ यांची सन्माननीय निवड करण्यात आली आहे. शिवचरित्र आणि इतिहासाच्या कार्याला या निवडीमुळे मोठे बळ मिळणार आहे.
याबाबतचा अधिकृत शासन निर्णय ६ मार्च २०२६ रोजी शासनाद्वारे निर्गमित करण्यात आला आहे.
यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली होती, त्यानंतर आता शासनाने या समितीची नव्याने पुनर्रचना करण्यास मान्यता दिली आहे. या नवनिर्वाचित समितीचा कार्यकाळ ३ वर्षांचा असणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या समितीचे अध्यक्ष असतील. श्री. प्रविण शेजुळ यांच्यासह शिवशंभु विचार मंचाचे रवींद्र सासमकर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात, गोरक्षणाथ अबुज, यांच्यासह राज्यातील इतर अनेक अभ्यासक आणि मान्यवरांची या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.