
मिरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्भेळ यश मिळाल्यानंतर महापौरपदी कोण बसणार, याची जोरजार चर्चा सुरू असताना मराठी एकीकरण समितीने भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर मराठी महापौर बसवला नाही तर रक्ताचा सडा पडेल, असे मराठी एकीकरण समितीने म्हटल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी एक पाऊल पुढे टाकत रक्ताचा सडा पडेल पण ते रक्त मराठी माणसाचे नसेल, असे वक्तव्य केले.
ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मराठी महापौराच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या सूरात सूर मिसळला. सगळ्याच पक्षातून निवडून आलेल्या नगरसेवकांना शुभेच्छा देतो पण महापौरपदाचा विषय येतो तेव्हा मात्र भूमिपुत्रालाच न्याय दिला जावा, अशी आग्रही भूमिका अविनाश जाधव यांनी मांडली.
अविनाश जाधव काय म्हणाले?
मराठी महापौर बसवला गेला नाही तर रक्ताचा सडा पडेल. मात्र हे रक्त मराठी माणसाचे नसेल, असे अविनाश जाधव म्हणाले. विकासकामांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपल्याला पाठिंबा असेल पण महाराष्ट्रात मराठीच महापौर बसवला जावा, अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि हे तुम्हाला पाळावेच लागेल, असे अविनाश जाधव म्हणाले.