आरबीआय ने लॉन्च केला डिजिटल रुपी

मुंबई (प्रतिनिधी): आरबीआयने आज अधिकृतपणे डिजिटल रुपीला (Digital Rupee) लाँच केले आहे.सध्या हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. अनेकांना डिजिटल रुपी आणि यूपीआय पेमेंट समान वाटत आहे. परंतु, या दोन्हीही गोष्टी वेगळ्या आहेत.

डिजिटल रुपी म्हणजे काय रे भाऊ?

डिजिटल रुपी हे रोख रक्कमेचे डिजिटल स्वरूप आहे. म्हणजेच, आपण आता ज्याप्रमाणे रोख पैसे खर्च करतो,त्याप्रमाणे डिजिटल रुपी खर्च करू शकतो.

 

UPI आणि डिजिटल रुपीमधील फरक…

सध्या यूपीआय द्वारे होणारे पेमेंट हे सर्व ट्रांजॅक्शन डिजिटल स्वरुपात होत असले तरी देवाण-घेवाण ही रोखच असते. म्हणजे पद्धत फक्त डिजिटल असली तरीही पेमेंट रोखच होते. परंतु, आरबीआयने या पायलट प्रोजेक्टला पूर्णपणे लागू केल्यास रोख पैशांची जागा डिजिटल रुपी घेईल. गुगल पे आणि फोन पे द्वारे होणाऱ्या व्यवहारांपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे.

 

डिजिटल रुपी खरेदी करता येईल का?

डिजिटल रुपीला तुम्ही खरेदी करू शकत नाही. ही कोणतीही वस्तू अथवा क्रिप्टोकरन्सी नाही. हे एकप्रकारचे चलनच आहे. आजपर्यंत आपण कागदी व नाणी स्वरुपात असलेल्या रुपयाला कधी खरेदी केले नाही. त्याप्रमाणेच डिजिटल रुपीला खरेदी करावे लागणार नाही. भविष्यात रुपीला दुसऱ्या चलनासोबत एक्सचेंज करता येईल. टोकन आधारित डिजिटल रुपी असेल, जे तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होईल. थोडक्यात, तुम्ही डिजिटल रुपीला ट्रान्सफर करू शकता; परंतु खरेदी करू शकत नाही. बँक डिजिटल वॉलेट उपलब्ध करेल व यातूनच पैसे खर्च करता येईल.

असे मिळेल Digital Rupee चे टोकन…

e₹-R डिजिटल टोकन स्वरुपात असेल. याचा उपयोग पर्सन-टू-पर्सन आणि पर्सन-टू-मर्चेंट दोन्ही व्यवहारांसाठी करू शकता. आरबीआयने या पायलट प्रोजेक्टसाठी ८ बँकांची निवड केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि IDFC First बँक सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होतील. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँका प्रोजेक्टमध्ये नंतर सहभागी होतील. सुरुवातीला ही सेवा नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरात सुरू केली जाईल.

 

डिजिटल रुपीचे फायदे….

डिजिटल रुपीचे मुळे नाणी व नोटा निर्मितीसाठी लागणारा खर्च आरबीआय कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. डिजिटल रुपीमुळे हा खर्च कमी होईल. याच्या मदतीने ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल.चुकीच्या व्यवहारांमुळे होणारे नुकसान देखील टाळता येईल. रुपी ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवर आधारित असल्याने रक्कम चुकीच्या खात्यात जाणार नाही. थोडक्यात, डिजिटल रुपीद्वारे केलेला व्यवहार अधिक सुरक्षित असेल.

Leave a Reply