Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीपूर्वीच शरद पवारांनी थेट बारामतीतून स्पष्ट केली आपली भूमिका; म्हणाले, “तटकरे आणि पटेल…”

मात्र, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी शरद पवारयांना न विचारता घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता या सर्व चर्चांवर थेट जेष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

आज सकाळी त्यांनी बारामतीतून पत्रकार परिषद घेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांना पक्षाने आणि बारामतीकरांनी अखंड साथ दिली. अशी काम करणारी कर्तृत्ववान व्यक्ती सोडून जाते हा मोठा आघात आम्हा सर्वांवर झाला आहे.

मात्र, या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अजितची काम करण्याची पद्धत चालू ठेवावी लागेल. आमच्या कुंटुबातील नवी पिढी नक्की हे करेल असा विश्वास आहे, असं पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना जाऊन ४ दिवस झाले नाहीत तोवर त्यांच्या पदाबाबत चर्चा सुरू आहे. याकडे तुम्ही कसं बघता, ही जास्त घाई होत नाही का? असं विचारताच शरद पवार म्हणाले, “या विषयाची आम्ही इथे चर्चाच करत नाही. ही चर्चा इथे झाली नाही. ती मुंबईत सुरू आहे.

सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलं आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही., असं म्हणत शरद पवारांनी एक प्रकारे या सर्व चर्चेपासून त्यांना अजित पवारांच्या नेत्यांनी दूर ठेवल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांसोबत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. १२ तारखेला याबाबतची घोषणा होणार होती. मात्र, त्याआधीच हा मोठा आघात झाल्याचंही पवारांनी सांगितलं, त्यामुळे कालपासून शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवलं जात आहे का? असे जे प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर आता पवारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरणच दिलं आहे.

Leave a Reply