मुंबई प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीतील अनेक आमदारांवर भाजपला पाठिंबा देण्याबाबत दबाव असून भविष्यात कुणी भाजप मधे गेलाच तर तो त्याचा व्यक्तिगत निर्णय असून राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही सदैव शिवसेने सोबत महाविकास आघाडी मधेच राहणार असल्याचे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितले असल्याचे आज संजय राऊत यांनी स्पष्ट केले.परंतु शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
राष्ट्रवादीचे 35 ते 40 आमदार एकनाथ शिंदे प्रमाणे भाजपच्या संपर्कात असल्याची कुणकुण शरद पवारांना लागली असून या आमदारांचा भाजप प्रवेश किंवा गट म्हणून भाजपला पाठींबा देणार असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या दैनिकाने देताच शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर दबाव असल्याचे उद्धव ठाकरेंकडे मान्य केल्याचे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदे मध्ये सांगितले.दरम्यान 7 एप्रिल रोजी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसां सोबत दिल्लीत अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा माध्यमातून झाल्याने लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याचे दिसते.