संपूर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
ढवळपुरी गावात होणार शेळी-मेंढी समूह प्रकल्प
शेळी- मेंढी विकास महामंडळाच्या नव्या प्रक्षेत्राचा अहमदनगर जिल्ह्यात १ मे रोजी शुभारंभ
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळीपालनास महत्त्वाचे स्थान आहे .राज्यातील शेळी पालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळी-मेंढी समूह प्रकल्प व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे नवीन प्रक्षेत्र १ मे रोजी शुभारंभ होणार असल्याचे माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
आज मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची आढावा बैठक घेण्यात आली.मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, राज्यामध्ये समूह विकासामधून शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देवून शेळी मेंढी पालन संबंधीत नवीन उद्योजक निर्माण करणे. शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्या माध्यमातून त्यांना शेळी मेंढी पालन व्यवसायाकरिता प्रवृत्त करून त्यांचे या व्यवसायाबाबतचे कौशल्य विकसित करणे व त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार निर्मिती होऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचाविण्यास यामुळे मदत होणार आहे.या भागातील शेळी मेंढी पालकांना सतत निर्माण होणारा शेळया व मेंढ्याच्या विपणन व्यवस्थेचा प्रश्नही सुटणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत शेळ्या- मेंढ्या पासून मिळणाऱ्या विविध पदार्थ व उपपदार्थ यांचे प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक निर्माण होवून रोजगार निर्मिती सुद्धा होईल.जील्ह्यामध्ये शेळी उद्योगाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करता येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी बैठकीत अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकारी विकास महासंघाचे सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीस प्रधान सचिव जगदीशप्रसाद गुप्ता, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.