सुषमा अंधारेमुळे शिवसेनेत नाराजीनाट्य
सोलापूर : जिल्ह्यातील सांगोला येथे रविवारी महाप्रबोधन यात्रा पार पडली. सुषमा अंधारे यांच्या बेलगाम वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरत असलेली महाप्रबोधन यात्रा सांगोल्यात मात्र वेगळेच मुद्द्यांवरून चर्चेत आली.या महाप्रबोधन यात्रेतील सभेत सांगोला तालुक्यातील रहिवासी व शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांना या सभेत बोलू दिले गेले नाही. तसेच, त्यांचा नामउल्लेखही टाळला गेल्याने ते या सभेतून उठून गेले, याची चर्चा सोलापुरच्या राजकारणात होत आहे.
नुकत्याच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरू केलेली महाप्रबोधन यात्रा त्यांच्या बेलगाम वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरत आहे. सुषमा अंधारे सतत वारकरी संप्रदाय, हिंदूंची अस्मिता, देवी देवता यांच्यावर प्रहार करत असल्यामुळे या यात्रेवर टीका होत आहे. सांगोल्यात ही सभा शिवसेनेच्याच प्रवक्त्यामुळे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील रहिवासी असलेले प्रा. लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षाची बाजू मांडण्यासाठी पक्षाचे प्रवक्तेपद दिले. रविवारी त्यांच्या तालुक्यातील सांगोला येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा होती. शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज्यपातळीवर शिवसेनेत महत्त्वाची भूमिका मांडणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाके यांचा साधा नामोलेखही केला नाही. कार्यक्रमाचे संयोजकांनीही त्यांना दुर्लक्षित केले.शिवसेनेत प्रवक्ते यासारखे महत्त्वाचे पद असूनही दररोज माध्यमातून आणि विविध कार्यक्रमांद्वारे आपल्या भाषणातून शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या प्रा. लक्ष्मण हाके यांनाही सांगोला येथील कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली नाही. यामुळे नाराज झालेले प्रा. हाके चिडून कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठावरून निघून गेले.
सांगोला येथील महाप्रबोधन यात्रेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव, तुषार इंगळे आदींची भाषणे झाली. पण, शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके आणि सांगोला तालुक्यातील एकाही पदाधिकाऱ्याला आपले मनोगत व्यक्त करता न आल्याने तसेच महाप्रबोधन यात्रेसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यातही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या नाराजी नाट्याविषयी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘मी दुखावलो आहे; पण….’
मी खूप लहान माणूस आहे; परंतु अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे जी भूमिका मिळाली आहे, ती पार पाडत असतो. माझ्यात काहीतरी योग्यता असेल म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रवक्तेपद दिले. मी उद्धवसाहेबांचा शिवसैनिक आहे. मला दुर्लक्षित करून माझा अपमान करणाऱ्या वरिष्ठांच्या लेखी मी शून्य असेन; परंतु त्यांनी प्रवक्तेपदाचा तरी सन्मान राखला पाहिजे. या पुढील काळात शिवसेनेची भूमिका मांडताना याचा माझ्यावर जराही परिणाम होणार नाही. माझी भूमिका मी सक्षमपणे पार पाडली होती. यापुढेही निरंतर आणि निष्ठेने माझे काम सुरू ठेवेन. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवून महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मात्र माझ्याच तालुक्यात येऊन माझ्या पदाचा सन्मान न राखल्याने मी दुखावलो आहे, असे शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले.