सांगली : राज्यात सध्या मराठा व धनगर समजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.आरक्षणासाठी मराठा समाजास ४० तर धनगर समाजास ५० दिवसांची मुदत सरकारकडून देण्यात आलेली असताना सदर मुदत संपण्यापूर्वीच या दोन्ही समाजातील तरुण कार्यकर्ते आरक्षणासाठी टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत.मराठा समाजातील दोघांनी आरक्षण मिळावे, यासाठी जीवनयात्रा संपवली आहे.काल जात येथे धनगर समाजातील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने समाजातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेले अधिक वृत्त असे कि, धनगर समाजास आरक्षण मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बिरुदेव वसंत खर्जे (वय ३८, आबाचीवाडी, कुणीकोनूर, ता. जत) या तरुणाने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.रविवारी (ता. २२) सायंकाळी ही घटना घडली आहे.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. मात्र, पोलिस उपअधीक्षक सुनील शेळके यांनी प्राथमिक तपासात आरक्षणाच्या मागणीसाठी घटना घडल्याचे समोर आल्याचे सांगितले.
आज आरेवाडी येथे बिरोबा बनात आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा झाला. मेळावा बिरुदेव खर्जेने घरात बसून मोबाईलवर पाहिला. त्यानंतर काही वेळाने तो घरातून शेताकडे निघून गेला व आपल्याच शेतात झाडाला गळफास घेतला. बिरुदेवची मुलगी शेताकडे पाण्याची मोटार बंद करण्यास गेली असता तिने बिरुदेवचा मृतदेह झाडावर पाहिला. तेंव्हा हि घटना उजेडात आली.ग्रामस्थ व पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
काय आहे सूसाइड नोट मध्ये ?
प्राथमिक तपासात पोलिसांना बिरुदेव खर्जे याच्या खिशात धनगर समाजास आरक्षण मिळावे, माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी धरू नये व कुटुंबाला कशाचा त्रास होऊ नये, अशी चिठ्ठी आढळली आहे.