ऊसाला २९०० रुपये पेक्षा जास्त भाव देणार:धैर्यशील सोळंके

माजलगाव दि १३ (बातमीदार)आपल्या कारखान्याने चालू गळीत हंगामात १४३ दिवसांचा गाळप हंगाम पुर्ण करत कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप पूर्ण केल्याची माहिती चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली. यंदा ऊस उत्पादकांना आपण योग्य भाव दिला असुन आ. प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील हंगामात २९००/- रूपये प्रती टन पेक्षा जास्त भाव देणार असल्याची महत्वपुर्ण घोषणाही यावेळी चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी केली.

 

तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या ३१ व्या ऊस गाळप हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन धैर्यशील सोळंके यांच्या प्रमुख उपस्थीतीत गुरुवार दिनांक १३/४/२०२३ रोजी पार पडला. यावेळी शेती समितीचे अध्यक्ष भागवतराव देशमुख यांच्या शुभहस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प.सदस्य औदुंबर सावंत, माजी प.स. सभापती उमाकांत सोळंके, विठ्ठल लगड,विजय लगड, नगरसेवक संभातात्या शिंदे, बाबुराव धुमाळ, सरपंच तेलगाव यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस चालु ऊस गाळप हंगामात ज्या ऊस वहातुकदार ट्रॅक्टर चालक, ट्रक चालक, मिनी ट्रॅक्टर चालक तसेच बैलगाडीवान यांनी विक्री ऊस तोड करुन प्रथम क्रमांक मिळवला अशांचा चेअरमन धैर्यशील सोळंके यांच्यासह इतर संचालकांच्या हस्ते सत्कार करुन रोख बक्षीस देऊन सन्मान केला. याप्रसंगी उपस्थीतांना मार्गदर्शन करताना चेअरमन श्री. धैर्यशील सोळंके म्हणाले की, चालु गाळप हंगामात आपल्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याने १४३ दिवसांचा गाळप हंगाम पुर्ण करुन कार्यक्षेत्रातील ७३०७७२ मे.टन ऊसाचे गाळप करुन ४१३५१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर को. जनरेशन व इथेनॉलचेही विक्री उत्पादन केले. गतवर्षी पेक्षा २० ते २२ दिवस आपला कारखाना यंदा उशिराने चालु झाल्याने जवळपास १ लाख मे. टन ऊस गाळपाचे नुकसान झाले. मात्र उशिरा चालु होऊनही आपल्या कारखान्याच्या सर्व यंत्रणांनी जीवतोड मेहनत घेऊन कार्यक्षेत्रातील एकाही शेतक-याचा ऊस न ठेवता सर्वांच्या ऊसाचे गाळप पुर्ण केले. मराठवाडयातील सर्वात शेवटी बंद होणारा आपला एकमेव कारखाना आहे. या हंगामात आपणास महिन्द्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीने ठरवुन दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपण ऊस लागवड केली होती. त्यास ऊस उत्पादकांनीही प्रतिसाद दिला होता यामुळे आपल्या कारखान्याची रिकव्हरी चांगली येण्यास मदत झाली असुन उपपदार्थ निर्मीतीचे प्रकल्पाच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे सोळंके यांनी सांगितले. आगामी गाळप हंगामातही आपला कारखाना विक्रमी ऊसाचे गाळप करणार असुन यासाठी आतापासुनच सर्व यंत्रणांनी कामास लागावे असे आवाहन करत शेतक-यांनीही नियोजना प्रमाणे ऊस लागवड केल्यास आपल्या कारखान्याची रिकव्हरी चांगली येवुन त्याचा लाभ ऊस उत्पादकांनाच होईल असे सांगत चालु हंगामात आपण विक्रमी २७००/- रुपये ऊसाला भाव दिला असुन पुढील हंगामात याहीपेक्षा जास्त २९०० /- रु. पेक्षा जास्त भाव देणार असल्याची घोषणाही यावेळी चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी करताच उपस्थीत ऊस उत्पादकांनी टाळया वाजवुन या घोषणेचे स्वागत केले.

 

यावेळी कार्यक्रमास सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकारी संचालक श्री. एम. डी. घोरपडे, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार संचालक श्री. छगनराव जाधव यांनी केले.

Leave a Reply