‘तो’ वाघ नव्हे बिबट्या; वन विभागाचा दावा

शेतकऱ्यांनो, सावध रहा! वन विभागाचे आवाहन

माजलगाव,दि.२९: माजलगाव तालुक्याच्या टोकास तर गेवराई तालुक्याचे हद्दीवर असलेल्या इरला मजरा व चिंचोली येथे शेतकऱ्यांना दिसलेला ‘तो’ वाघ नसून बिबट्या असल्याचा प्रथम दर्शनी निष्कर्ष वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.

 

आज सकाळी १० वाजता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सदर शिवारात भेट देऊन पाहणी केली.पाऊलाचे ठसे पाहून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. या बाबत खात्रीसाठी वरिष्ठांना सदरील पाऊलाचे ठसे पाठवले आहेत.

 

माजलगाव तालुक्यातील इरला मजरा हे गाव तालुक्याचे शेवटचे गाव आहे. शेतकरी अशोकराव कोटुळे हे शेतात मंगळवार दि.२८ रोजी सायं.६ वाजण्याच्या दरम्यान बाजरीला पाणी देत असताना अचानक पाच सहा फुटांवर वाघ दिसला. म्हणून त्यांनी गावात येऊन गावकऱ्यांना हकीकत सांगीतली. तसेच तहसीलदार यांना संपर्क साधून माहिती दिली. तहसिल प्रशासनाने वन विभागास कळवले, त्यानुसार आज दि.२९ बुधवारी सकाळी १०.३० वाजता माजलगाव विभागाचे वन परिमंडळ अधिकारी दिनेश मोरे, गेवराई वन परिमंडळ अधिकारी सुनिल टाकणखार, तलाठी सुधाकर पराड यांनी सदरील ठिकाणी भेट देऊन पावलाच्या ठसे पाहणी केली. त्यात सदरील ठसे हे बिबट्याचे असल्याचे प्रथम दर्शनी निष्कर्ष वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांनो, सावध रहा!

सदरील बिबट्या हा इरला मजरा व चिंचोली शिवारात असल्याने त्या परिसरातील तालखेड, पुंगणी, एकदरा, तेलगाव खु., डब्बा मजरा, पूंगणी व गेवराई तालुक्यातील त्या लगत असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.सदरील पाऊलाच्या ठस्यावरून वाघ नसून बिबट्या असल्याचे दिसून येते. शेतात जाताना एकट्याने न जाता सोबत घेऊन जावे, बिबट्या दिसल्यास त्याच्यावर हल्ला करू नये. बिबट्या हा भित्रा प्राणी असल्याने स्वतः हल्ला करत नाही. स्वतःच्या गळ्याला रुमाल वापरावा, रात्रीच्या वेळेस फटाके असतील तर वाजवा किंवा स्वतः जवळील मोबाईल वर गाणे वाजवावे ज्यामुळे बिबट्या जवळपास थांबनार नाही. तसेच वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकऱ्यांना माजलगावचे वन परिमंडळ अधिकारी दिनेश मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply