‘वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा’
माजलगाव, दि.२९: तालुक्यातील इरला मजरा शिवारात शेतकरी काम करत असताना (मंगळवारी) साय.६ वाजण्याच्या दरम्यान Tiger वाघ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंचक्रोशीतील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, रात्री नायब तहसीलदार भंडारी यांनी सदर शिवारात भेट देऊन पाहणी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इरला मजरा येथील शेतकरी अशोकराव कोटुळे हे शेतात काल मंगळवार रोजी (दि.२८) सायं.६ वाजण्याच्या दरम्यान बाजरीला पाणी देत असताना अचानक पाच सहा फुटांवर वाघ दिसला. वाघाची व त्याची नजरा नजर झाली, मात्र सुदैवाने त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यांनी धावत पळत गावात येऊन ही बातमी गावकऱ्यांना सागितली.गावातील १० ते १२ लोक पुन्हा कुठे वाघ दिसतो का, हे पाहण्यासाठी आले असता, बाजरी मध्ये पाणी दिलेले असल्याने वाघाच्या पावलाचा मागोसा घेत घेत काही अंतरावर गेले. तर समोर पुन्हा वाघ दिसला, लोकांनी आरडा ओरड केल्याने त्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकत, शेजारी असणाऱ्या गेवराई तालुक्यातील चिंचोली शिवारात आश्रय घेतला.
ग्रामस्थांनी तहसिल प्रशासनास माहिती दिली असता रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान नायब तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली. वन विभागाचे अधिकारी आज गावात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.