तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी सुट्टी जाहीर करावी असा प्रस्ताव सादर करु…….. श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

*तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी सुट्टी जाहीर करावी असा प्रस्ताव सादर करु…….. श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

*स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक , दादर , आम्ही पुणेकर संस्था तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि शिवशंभू विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने* जम्मू – काश्मीर येथील भारत पाक सीमेवरील पूंछ येथील सैनिकांच्या छावणीत भारतीय सैन्यदलाद्वारे स्थापन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या रथयात्रेचे स्वागत आणि त्याच्या पुढील प्रवासासाठी निरोप देण्याचा कार्यक्रम शिवशंभूभक्तांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर मुंबई येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज सन्माननीय *शिवेंद्रसिंहराजे भोसले* (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि
सन्माननीय *आशिषजी शेलार* (माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्रजी वराडकर आणि कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे तसेच सुधीरजी थोरात,अभयजी जगताप, पंकजजी भोसले, रवींद्रजी सासमकर,ज्ञानेश्वरजी पाठारे , अमितजी घाटये
यांच्यासह शिवशंभू विचार मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन पंकजजी भोसले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वा. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूंछकडे रवाना होणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेली *जय जय शिवराया* ही आरती गात दिवे ओवाळून पूजन करण्यात आले .
प्रमुख पाहुण्यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, तसेच स्वा. सावरकरांची मूर्ती आणि वंदेमातरमच्या १५०व्या निर्मीती वर्षानिमित्त संपूर्ण वंदे मातरम् मोडी लिपीत लिहिलेले पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मंजिरीताई मराठे आणि हेमंत जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
मंजिरी मराठे यांनी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेची माहिती देत स्वा. सावरकर यांच्या ६० व्या आत्मार्पण दिनानिमित्त अभिवादन करत, पूंछ येथे निघालेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या रथयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवशंभू विचार मंचचे कोकण प्रांत संयोजक अभयजी जगताप यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. शिवजयंती ही तिथीनुसार म्हणजेच *फाल्गुन वद्य तृतीया* या दिवशी साजरी करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी व तो प्रस्ताव या अधिवेशनात मांडला जावा, असे आवाहन उपस्थित दोन्ही प्रमुख पाहुणे असलेल्या मंत्रीगणांना केले. पूंछ येथे निघालेल्या शिवाजी महाराज स्मारकाच्या अश्वारूढ पुतळ्याच्या रथयात्रेसाठी अभयजी जगताप यांनी शुभेच्छा देत आपल्या भाषणाची सांगता केली.
त्यानंतर दोन्ही प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली त्यात *अभयजी जगताप यांनी मांडलेला विषय आता सुरू असलेल्या अधिवेशनात मांडू तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे देखील हा विषय मांडू असे सन्माननीय मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.* दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्वा. सावरकर आणि शिवाजी महाराज यांच्या कार्यकौशल्याचा गौरव आपल्या भाषणातून केला. ज्या ज्या भागातून हा अश्वारूढ पुतळा जाईल त्या त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चरित्राची, शौर्याची , पराक्रमाची प्रेरणा देत जाईल , अशा शुभेच्छा रथयात्रेसाठी दिल्या. सन्माननीय मंत्री आशिष जी शेलार यांनी इतिहासच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेल्या बदलांचा देखील उल्लेख केला.
कार्यक्रमाची सांगता पंकजजी भोसले यांनी कविभूषण यांच्या वीररसयुक्त छंदाने केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंभू विचार मंचचे सुधीरजी थोरात, अभयजी जगताप, पंकजजी भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
*छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, भारतमाता की जय, वंदे मातरम्, गंगा माता की जय, गो माता की जय अशा जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.*
🚩🚩

Leave a Reply