खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने उभे ठाकले असून. उदयनराजे भोसले समर्थकांनी उद्घाटनाचा हा कार्यक्रमच उधळून लावला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आज सकाळी नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. त्यानिमित्ताने संपूर्ण तयारी करण्यात आली होती. तसेच शिवेंद्रराजे यांच्यासाठी कंटेनर ऑफिसही उभारण्यात आलं होतं. खिंडवाडी येथे हा कार्यक्रम होणार होता. पण उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन हा कार्यक्रम उधळून लावला. तसेच शिवेंद्रराजे यांचं कंटेनर ऑफिसही तोडून टाकलं. यावेळी उदयनराजे भोसले समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवेंद्रराजे यांचा निषेधही नोंदवला. घटनेमुळे शिवेंद्रराजे समर्थक आणि उदयनराजे समर्थक आमनेसामने आले आहेत. तसेच दोन्ही गावेही आमनेसामने उभे ठाकले आहेत.
दोन्ही राजांमधील वाद विकोपाला गेल्याने खिंडवाडीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस घटनास्थळीच आहेत दरम्यान, या राड्यानंतरही नवीन जागेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी नारळ फोडून भूमिपूजन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांनी शिवेंद्रराजे यांच्या समर्थनार्थ घोषणा देतानाच उदयनराजे भोसले यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय टाकण्यात आलं आहे. ती जागा उदयनराजे भोसले यांच्या मालकीची असल्याने हा वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं.दरम्यान साताऱ्यात तनावाची स्थिती आहे.