संभाजीराजांना “धर्मवीर” म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे ! कागदपत्रे साक्ष देतात!! “स्वराज्यरक्षक संभाजी” हे मार्केटेबल टायटल श्री अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले इतकेच.
अस्सल कागदपत्रे सांगतात की , गेली 105 वर्ष महाराष्ट्र शंभूराजांना “धर्मवीर” या लाडक्या नावाने ओळखतो आहे. स्वतः संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी स्वतः कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वतः जे दानपत्र लिहून दिले आहे . .
आज-काल विशेषत: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते.
गेल्या शतकातील मायमराठीतील श्रेष्ठ नाटककार व कादंबरीकार श्री. नाथमाधव यांनी 1917 मध्ये संभाजी राजांच्यावर “मराठ्यांचा आत्मयज्ञ “या नावाचे नाटक लिहिले होते. त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी ‘धर्मवीर’ या उपाधीचा उल्लेख केला आहे. कृ. बा. भोसले यांनी 1929 मध्ये ‘रक्तरंगण” या नावाचे नाटक लिहिले. त्यामध्ये सुद्धा संभाजी राजे यांचा धर्मवीर या उपाधीनेच सन्मान करण्यात आलेला आहे. तसेच पुढे 1941 मध्ये तर ग ृ क्रू बोडस यांनी “धर्मवीर संभाजी” या नावाचेच नाटक 83 वर्षांपूर्वी लिहिले होते. त्या नाटकाचे गावागावात प्रयोग झाले होते. त्या काळातच संभाजी राजांच्या नावापुढे लागलेला धर्मवीर हा किताब महाराष्ट्रभर पसरला होता.
1929 मध्ये म्हणजेच 94 वर्षांपूर्वी तेव्हाचे महाराष्ट्रातले अतिशय गाजलेले शाहीर पांडुरंग खाडिलकर यांनी ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” या शीर्षकानेच पोवाडा लिहिला आहे. त्याच्या पहिल्या ओळी अशा आहेत. “धन्य धन्य संभाजी वीर/ छत्रपती धीर /जरी झाले तुकडे देहाचे भूमीवर पार/ आजराअमर कीर्ती जोडीला तिन्ही लोकांवर/ झाला धर्मवीर संगरी गाजली तलवार //
जुन्या काळातले संदर्भ दाखवून देतात की, खाडीलकरांचा हा पोवाडा “धर्मवीर संभाजीराजांचा पोवाडा” म्हणून तेव्हा महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये गाजलेला होता. त्यामुळे गेली शंभर वर्षाच्या इतिहासाने, लोकपरंपरेने आणि महाराष्ट्र संस्कृतीनेच संभाजीराजांना “धर्मवीर” ठरवले आहे. एकगट्टा मताच्या आशेने राजकारण बदलता येईल. पण अस्सल कागदपत्रे, उपलब्ध असलेला आणि घडलेला सत्य इतिहास कोणालाही इच्छेप्रमाणे बदलता येणार नाही.
छत्रपती संभाजीराजे यांनी कोकणातल्या बाकरे शास्त्री यांना करून दिलेल्या दानपत्राचे स्पष्टीकरण देताना गेल्या शतकातील बहुजन समाजातील श्रेष्ठ शिक्षणतज्ञ, अभ्यासक आणि साहित्यिक श्री वि.द. घाटे यांनी आपल्या “विचारविलसिते” या ग्रंथामध्ये विवेचन केलेले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, संभाजीराजांचे मन “मोगलांशी संग्राम म्हणजे सुरानी चालविलेला असूरांशी संग्राम असेच ते संवेदनाशील मन (संभाजीराजांचे) मानत होते .
दानपत्रात राजे दिलेरखानाला चक्क “दिलेरअसुर” म्हणतात. या ऐतिहासिक महत्त्वाच्या दानपत्रात राजांनी दोन शब्द वापरले आहेत. त्यांना मोल नाही. “हेंदवी धर्म “हे ते शब्द. “हेंदवी धर्म” म्हणजे हिंदूंचा धर्म. सिंधूपासून जसा सैंधव तसाच हिंदूपासून हिंदैव.”
बाकरे शास्त्री यांना दस्तूरखुद्द संभाजीराजांनी करून दिलेल्या या दानपत्राचा उहापोह डॉक्टर कमल गोखले यांनी आपल्या मौल्यवान ग्रंथात पान क्रमांक 424 व 425 वर केला आहे. तसेच डॉक्टर सदाशिव शिवदे यांनीही आपल्या संभाजीराजांवरील ग्रंथांमध्ये हे संपूर्ण दानपत्र छापलेले आहे. त्या दानपत्रात सोयराबाईंचा उल्लेख त्या स्पटिकापूहून स्वच्छ आणि मनाने सुंदर पाक आहेत असे शंभूराजांनी म्हटलेले आहे. या दानपत्राचे अनन्यसाधारण महत्व डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सुद्धा आपल्या संभाजीराजांच्या गौरवग्रंथामध्ये नमूद केले आहे( पान क्रमांक 323 द्वितीय आवृत्ती ).
सर्व कागदपत्रे पाहता हे दिसून येते की, संभाजीराजांनी आपल्या जीवनामध्ये हिंदू धर्मातील अवडंबर व वाईट चालीरीतीचा नक्कीच वेळोवेळी निषेध केला आहे. त्या नाकारल्या सुद्धा आहेत. वाहते पाणी धर्मानुसार अडवायचे नसते. पण राजांनी पहिल्यांदा विशाळगड भागात धरणाची कल्पना अमलात आणली. तात्पर्य त्यांनी हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीती जरूर नाकारलेल्या होत्या. पण आपल्या हिंदूधर्माचा त्यांनी कधीही त्यांग केला नव्हता .
आज माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा हिंदू धर्मातील चातुर्वर्ण, कर्मकांडाचा अतिरेक आवडत नाही. पण म्हणून हिंदूधर्मच संपूर्ण वाईट आहे असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. तसेच संभाजी राजे आणि शिवाजी राजे हे “संपूर्ण हिंदू धर्मा”च्या विरोधी होते. शिवाय औरंगजेब आणि अफजलखान यांच्या क्रौर्र्याचे गाडीभर पुरावे असताना ते संतमहात्मे होते, असे जाहीरपणे सांगायचे महाराष्ट्र देशी जे प्रयोग चालू आहेत. ते पूर्णतः धक्कादायक आणि इतिहासबाह्य आहेत.
शेवटी 94 वर्षांपूर्वी शाहीर खाडिलकर यांनी “धर्मवीर संभाजी महाराज” या आपल्या पोवाड्यात संभाजीराजांनी औरंगजेबाला उद्देशून म्हटलेल्या काही ओळींचा पुन्हा निर्देश करायचा मोह मला होतो.
“संभाजी वीर खवळला बेफाम झाला/ बोलू लागला/— मला नको धर्म तो तुझा/ तुझ्या बापाचा/ तुझ्या काकाचा /एक मला रामचंद्र प्रभू प्यार/—- कर तुकडे तुकडे देहाचे /पंचभूतांचे/ जीव पर साचे/ नित्य भगवान तिन्ही लोकांत/ पुन्हा येईन जन्म घेऊन /तुझी मान चरारा चिरून/ कोल्हाकुत्र्याहाती खाववीन/ —संभाजी छत्रपती वीर/ शिवाचा तीर/ अर्पिले शिर /धन्य नरवीर लोकी झाला/ पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला/”
तात्पर्य, गेल्या शंभरहून अधिक वर्षे अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख “धर्मवीर” असाच करत आला आहे. ग दि माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा “धर्मभास्कर” असा केला होता. अन्यथा “स्वराज्यरक्षक” हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार श्री अमोल कोल्हे यांनी वापरला आहे. त्या शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही. .
कालाय तस्मै नमः
—- विश्वास पाटील (लेखक प्रसिध्द कादंबरीकार व माजी प्रशासकीय अधिकारी आहेत.)