देशातील बहुतांशी प्रादेशिक पक्षांवर कुटुंबियांचे वर्चस्व आढळून येते. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मुख्य प्रादेशिक पक्षांची सूत्रे ही कुटुंबाकडे राहिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली तेव्हापासून अजित पवार हे शरद पवारांना साथ देत आले. अजित पवार हे १९९१ पासून सक्रिय राजाकारणात होते. सुप्रिया सुळे यांचा संसदेत प्रवेश हा २००६ मध्ये झाला होता. पुढे शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण ? हा वादाचा मुद्दा निर्माण झाला. यातूच पुढे अजित पवारांनी पक्षात बंड केले.
अजित पवारांनी स्वतंत्र पक्ष जून २०२३ मध्ये स्थापन केला. अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांना महत्त्व दिले. पडद्याआडून पूत्र पार्थ पवार हे पक्षाची सूत्रे हलवित होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पत्नी सूनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविले होते. तेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी पत्नीला उमेदवारी देऊ नये, असे सुचविले होते. परंतु अजितदादांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सूनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर अजित पवारांनी राज्यसभेची जागा रिक्त होताच पत्नी सूनेत्रा पवार यांनाच खासदारकी दिली. एक. पत्नी खासदार तर पूत्र पार्थ हे पक्षाची सूत्रे हलवित होते. म्हणजेच अजित पवारांच्या पक्षातही घराणेशाही होती.
पुढे काय ?
अजित पवारांनंतर पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न विचारला जात आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून सूनेत्रा पवार यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. पण पत्नी सूनेत्रा किंवा पूत्र पार्थ अथवा जय पवार यांना राजकीय किंवा संघटनात्मक अनुभव नाही. राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यात ते कितपत यशस्वी होतील याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी एकत्रित राष्ट्रवादीतील अनेकांनी अजित पवारांच्या पक्षाचा पर्याय निवडला होता. अजित पवारांच्या पश्चात सत्तेच्या जवळ गेलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांकडे परतण्याची शक्यता कमीच आहे. शरद पवार हे भाजपबरोबर येण्याची शक्यता असेल तरच ही सारी नेतेमंडळी पवारांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारू शकतात.. शरद पवारांबरबोर जाऊन विरोधात बसण्याची कोणाची इच्छा दिसत नाही. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व अजित पवार गटाच्या नेत्यांना कधीच मान्य होणार नाही. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत.
भाजपची खेळी महत्त्वाची
राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील नेतृत्वाची पोकळी आणि पक्षाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या गोंधळात भाजपची भूमिका महत्त्वाची ठरेल. सत्तेची चटक लागलेले राष्ट्रवादीतील बडे नेते कदाचित भाजपचा मार्ग पत्करतील. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशी नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. शिवसेना उद्धव ठाकरे गट वाढू नये म्हणून भाजपला शिवसेना शिंदे गटाची ताकद कायम राहिल अशी व्यवस्था करावी लागते. राष्ट्रवादीबाबत तशी वेळ येणार नाही. शरद पवार गट कसाबसा तग धरून आहे. महानगररपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये शरद पवार गटाचा पार धुव्वा उडाला होता. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट कमकुवत झाला तरी त्याचा शरद पवार गटाला तेवढा फायदा होण्याची शक्यता कमी आहे. या साऱ्या लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे सूत्रे कोणाकडे जावीत या दृष्टीने भाजपकडून रणनीती तयार केली जाऊ शकते. तमिळनाडूत जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाच्या वादात भाजपनेच महत्त्वाची भूमिका बजावली होती याकडे लक्ष वेधण्यात येते.