पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्लासगोत जोरदार स्वागत

[ad_1]

ग्लासगो ; वृत्तसंस्था : हवामान बदलासंदर्भात स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या 26 व्या परिषदेला प्रारंभ झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे आगमन झाले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन तसेच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी स्कॉटिश एक्झिबिशन सेंटरमध्ये त्यांचे स्वागत केले. दरम्यान, भारतीय वंशांचे नागरिकही मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी ज्या हॉटेलमध्ये उतरले त्याठिकाणी भारतीय नागरिकांनी हाती तिरंगा घेत गर्दी केली होती. त्यात महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. त्यांचे आगमन होताच ‘भारत माता की जय…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘इस देश क्या यारो क्या केहना, मोदी है भारत का गेहना,’ असे गीतही भारतीयांनी यावेळी गायले.

सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तत्पूर्वी, हवामान बदलासंदर्भात जागतिक नेत्यांशी सकारात्मक चर्चा तसेच भारताची बाजू मांडण्यासाठी आपण येथे आलो आहोत. या संकटावर मात करण्यासाठी भारत प्रयत्नशील असून, इतरांसोबत मिळून काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.

या दौर्‍यात पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी द्विपक्षी चर्चा करणार असून वैयक्तिकरित्या ही त्यांची पहिलीच भेट असेल. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या पाच दिवसांच्या युरोप दौर्‍यास प्रारंभ झाला असून या दौर्‍यात ते स्विर्त्झलँड, फिनलँड, इस्रायल, नेपाळ, मालावी, युक्रेनसह इतर देशांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

दरम्यान, हवामानातील बदल हे अवघ्या विश्वासाठी धोकायदायक संकट ठरेल, असा गंभीर इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) दिला होता. त्यानंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेत तब्बल 120 हून अधिक देशांचे सर्वोच्च नेते तसेच प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply