[ad_1]
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ विविध राज्य सरकारांनीही दिवाळीत नागरिकांना दिलासा देत व्हॅटमध्ये (मूल्यवर्धित कर) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बारा राज्यांत पेट्रोल, डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. प्रामुख्याने भाजपशासित उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, आसाम, त्रिपुरा आदी राज्यांनी व्हॅटकमी केला आहे. सर्वाधिक स्वस्त इंधन आता उत्तर प्रदेशमध्ये आहे. पेट्रोल 7 आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये 2 रुपये कपात करण्यात आल्याने या राज्यात पेट्रोल, डिझेल प्रत्येकी 12 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारवरही इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबतचा दबाव वाढत आहे. याबाबत शनिवारनंतर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ सुरू आहे. देशातील बहुतांश भागात पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 115 रुपयांवर, तर डिझेलचे दर शंभर रुपयांवर गेले होते. इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढले आणि महागाई भडकल्याने
सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे दिवाळी सणातच नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेत केंद्र सरकारने बुधवारी रात्री पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे पाच रुपयांची, तर डिझेलमध्ये दहा रुपयांची कपात केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल किमान 5 रुपयांनी, तर डिझेल किमान 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
केंद्र सरकारचे अनुकरण करीत भाजपशासित राज्यांनीही लगेच गुरुवारी व्हॅटमध्ये (मूल्यवर्धित कर) कपातीचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशने पेट्रोल दरावरील व्हॅटकरात लिटरमागे 7 रुपये, तर डिझेल दरातील व्हॅटकरात दोन रुपये कपात केली आहे. यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 12 रुपयांनी स्वस्त झाले आहे. व्हॅट कमी केलेल्या राज्यांत बिहार, गोवा, आसाम, त्रिपुरा, सिक्कीम, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट प्रत्येकी सात रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली.
बिहारने पेट्रोलवरील व्हॅट 1.30 रुपयाने, तर डिझेलवरील व्हॅट 1.90 रुपयाने कमी केला आहे. आसाममध्ये पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट सात रुपयांनी कमी केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब यांनीही इंधनावरील व्हॅट सात रुपयांपर्यंत कमी केला जात असल्याचे सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही तशी घोषणा केली. ताज्या कपातीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल 6.07 रुपयांनी, तर डिझेल 11.75 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
भाजपशासित राज्यांनी व्हॅट कमी केल्याने महाराष्ट्र सरकारवर दबाव
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी करताच भाजपशासित राज्यांसह इतर राज्यांनी केंद्राचे अनुकरण करत व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी करून जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. आता राज्यातील ठाकरे सरकारवरही व्हॅट कमी करण्याचा दबाव आहे. व्हॅट कमी करणे शक्य आहे का? आणि तो कितपत कमी करता येईल, याबाबतचा आढावा घेण्याच्या सूचना राज्य सरकारने वित्त विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. शनिवारनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही राज्य सरकारकडे केंद्राप्रमाणे व्हॅटमध्ये कपात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हा निर्णय कधी घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वार्षिक महसुलात 40 ते 50 हजार कोटींची घट होण्याचे संकेत आहेत. व्हॅट कमी केल्यास या महसुलात आणखी घट होणार आहे. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्याने राज्य सरकारचाही व्हॅट आपोआप कमी होतो.
[ad_2]