विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठणकावलं…
मुंबई: कोणाच्याही मनासारखे निर्णय मी घेणार नसून कायदेशीर प्रक्रिया 15 दिवसांत झाली तर 15 दिवसांत निर्णय घेऊ अन्यथा वेळ लागणार असेल तर जास्त वेळ घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ब्रिटनचा दौरा संपवून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर मुंबईत विमानतळावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, मी कोणत्याही आरोपांना घाबरुन निर्णय घेत नाही. संविधान, कायद्याच्या तरतूदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन मी निर्णय घेणार आहे. त्यासाठीच राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व कोण करत होतं, त्याचााही निर्णय होण आवश्यक असल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पण हा निर्णय संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतच घेण्याबाबतचे सर्वोच्च न्यायलयाचे आदेश आहेत. हे पीटीशन सुरु असतानाच घटनेचे सर्वच नियम तरतूदी लागू होत असतात, त्यामुळे कायद्याच्या तरतूदींनूसारच निर्णय होणार असल्याचं नार्वेकरांनी ठामपणे सांगितलं आहे.
चौकशीची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण झाली तर आम्ही 15 दिवसांत निर्णय घेणार अन्यथा वेळ लागणार असेल तर अधिक वेळ घेणार आहे. 15 दिवसांत निर्णय व्हावा, अशी मागणी तर सगळेच सध्या करीत आहेत पण आम्ही कोणाच्याही मनासारखा निर्णय घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याबद्दलही यावेळी त्यांनी भाष्ये केलं असून उपाध्यक्षांना त्यांचे अधिकार चांगलेच माहित आहेत. उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार येत नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं आहे.
दरम्यान,राज्यात मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर सर्वाेच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं
काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष विदेश दौऱ्यावर होते. आज नार्वेकर मुंबईत दाखल झाले आहेत. सत्तासंघर्षाआधी विधानसभेच्या अध्यक्षपदावर नाना पटोले होते. त्यांनी राजीना दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ विधानसभेचं कामकाज पाहत होते. नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतरच या 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. या घडामोडींनंतर अखेर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निर्णय राहुल नार्वेकरांकडे सोपवला होता.
आता हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे असतानाच ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार शिंदे गटाच्या 16 आमदारांना लवकरात अपात्र ठरवावं, अशा मागणी केली आहे. त्यानंतर लगेचच आज नार्वेकर मुंबईत दाखल झाले आहेत.
झिरवळ यांच्याकडे ठाकरे गटाने केलेल्या मागणीबद्दल राहुल नार्वेकर आणि नरहरी झिरवळ चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनचा राज्याचा सत्तासंघर्ष मिटणार की नाही? राज्यात असलेलं शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयावरच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष याकडं लागलं आहे.