लातूर : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे पुत्र अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आज प्रचंड उधाण आलं. दिवसभर या विषयी चर्चा होती. लातूरचे भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकरांच्या (Sambhaji Patil Nilangekar) एका वक्तव्यानं त्याला आणखी बळ मिळालं. दिवसभर चालणाऱ्या या चर्चांनंतर आता अमित देशमुख यांनी मौन सोडले आहे. आपलं मौन सोडताना अमित देशमुख म्हणाले,“कितीही वादळं आली तरीही लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार”.अमित देशमुख यांच्या या विधानामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण संभाजी पाटील निलंगेकर यांचा रोख नेमका कुणाकडे होता? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.
पुढं बोलतांना अमीत देशमुख म्हणाले,“अडीच वर्षात तीन सरकार बदलली, चौथं कधीही येऊ शकेल”,
“अरे ही पाच वर्ष खरंच चमत्कारीच राहिली. आता जे सुरु आहे ना, ते तिसरं सरकार सुरु आहे. पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षांचं, आणि आता हे तिसरं सुरु आहे. चौथं कधीही येऊ शकेल. काहीही सांगता येत नाही”, असही अमित देशमुख म्हंटले.
“मला तुमच्या घरी या म्हणताय. तुम्ही स्वगृही यावं, असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक ठरेल”, असं प्रत्युत्तर अमित देशमुख यांनी दिलं.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढलेले असताना काँग्रेसला देशात गळती लागलेली आहे. विविध राज्यातील नेते काँग्रेस मधून बाहेर पडत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.