पोरींनो, तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा – प्रा. वसंत हंकारे

बीड  (प्रतिनिधी) :- कोणताही बाप आपल्या मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, अंगावर चांगले कपडे असावेत, त्यांची चप्पल सुद्धा फाटकी तुटके असू नये याची काळजी घेतो. स्वतः हलाखीचे जीवन जगत पाल्यांसाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाला आपल्यामुळे कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही याची खबरदारी मुलींनी आणि मुलांनी घेतली पाहिजे असे परखड मत सुप्रसिद्ध युवा व्याख्याते व प्रेरणादायी वक्ते माननीय प्रा. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. सौ. शिल्पा ओमप्रकाश शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका हृदयस्पर्शी व प्रेरणादायी कार्यक्रमात ते बोलत होते.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ‘ बाप समजावून घेताना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ओमप्रकाश शेटे, सहसंपादक अजित रांजवण, मुख्याध्यापक सुभाष करवा, विकास निकाळजे, दीपक लगड आदि मान्यवर उपस्थित होते. येथील माध्यमिक विद्यालय, लोकशक्ती विद्यालय व इंदिरा गांधी कन्या विद्यालयातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडूजी खांडेकर यांनी केले.


पुढे बोलताना हंकारे म्हणाले की, तुम्ही कोण आहात? माझा बाप कोण आहे? माझा बाप माझ्यासाठी काय करतो? याचा विचार प्रत्येक मुलीने अंतर्मुख होऊन केला पाहिजे. एकदा तरी बाप झोपल्यावर रात्रीच्या दोन वाजता उठून त्याच्याकडे बघा. त्याच्या पॅन्ट व बनियनला चार जागेवर ठिगळं दिसतील. मात्र तोच बाप तुम्हाला फॅन्सी व नवनवीन कपडे घालून शाळेत व काॅलेजला पाठवतो. आता आम्हाला प्रबोधनाची गरज नाही असा विचार न करता. तुमच्या आयुष्यात जो बदल घडणार आहे, त्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्ती बदलला पाहिजे, प्रत्येक लेकराच्या काळजामध्ये परिवर्तनाची आग लागली पाहिजे. २१ व्या शतकामध्ये मोबाईल मुळे पूर्ण पिढी बिघडत चालली असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर मुलींसोबतच मुलांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी हंकारे यांनी गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, फुले-शाहू – आंबेडकर, सावित्रीआई फुले, ताराराणी, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचा अंगावर शहारे आणणारा आणि क्रांतीची मशाल पेटवणारा इतिहास सादर केला. सावित्रीच्या लेकींनो स्वतःच्या मनाला विचारा, स्वतः उपाशीपोटी, उघड-नागडं वावरत रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकवणारा तुमचा बाप समजून घ्याल का? खरंच तुम्हाला बाप समजला का? अशी काळजाला भिडणारी आर्त साद त्यांनी मुला – मुलींना घातली. शेवटी बोलताना हंकारे यांनी सांगितले की, शाळेत चार मार्क कमी पडले तरी चालतील पण वाघासारख्या बापाला आयुष्यात कधीही मान खाली घालायला लावू नका.


‘बाप समजावून घेताना’ या विषयावर बोलत असताना अनेक उदाहरणे, काळजाला भिडणारे शब्द व प्रखर विचार आपल्या परिवर्तनवादी शब्दातून हंकारे यांनी मांडले.यावेळी उपस्थित विद्यार्थिनी, बहुसंख्येने आलेला पालकवर्ग, महिला अक्षरशः ढसाढसा रडत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वं मुला-मुलींना डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करायला लावले त्यानंतर आपल्या बापाला आठवा आणि बाबा मी तुमची मान कधीच खाली होऊ देणार नाही. समाजापुढे तुम्हाला मान खाली घालून वागावे लागेल असे कृत्य मी कधीच करणार नाही. अशी शपथ प्रा. हंकारे यांनी यावेळी विद्यार्थी-विद्यार्थ्यींनींना घ्यायला लावली.

यावेळी देवदूत ओमप्रकाश शेटे यांनी आपले विचार मांडले तर माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन संध्या शेप यांनी तर आभार श्रुती अंधारे हिने मानले.

Leave a Reply