अयोध्येत श्रीराममंदिर कशासाठी?

श्रीराम हा भारताचा आदर्श महापुरुष !
या आदर्शाने हिंदुसमाजाचे संपूर्ण भावविश्व व्यापलेले आहे.
भारताच्या प्रत्येक भाषेत रामकथा पोहचली आहे. देशाच्या विविध भागांना जोडण्याचे कार्य रामकथेने केले आहे.

शीखांच्या पवित्र धर्मग्रंथातदेखील लिहीले आहे,की रामनामाच्या स्मरणाशिवाय हा संसार मिथ्या आहे.

रट नाम राम बिन मिथ्या मानो, सगरो इह संसारा ।।
(पृष्ठ-703 श्री गुरु ग्रंथ साहिब)

“तथागत बुध्द आणि राम हे एकाच ईक्ष्वाकूच्या कुळातील होते. जातककथेतील अट्टकथेनुसार स्वत: तथागत गौतम बुध्दांनी दशरथजातकात वर्णिलेला राम आपणच असल्याचे म्हटले आहे. (सर्वोत्तम भूमिपुत्र , डाॅ.आ.ह.साळुंखे, पान क्र. 541/42)

जैनधर्मातदेखील श्रीरामकथेला फार महत्व आहे जैनधर्मात रामकथेवर आधारीत “पऊमचरिऊ” या ग्रंथाची रचना स्वयंभू (सत्यभूदेव ) यांनी केली आहे. अशा प्रकारे श्रीराम हा भारताला जोडणारा महापुरुष आहे.

श्रीरामजन्मभूमीचे अंदोलन अनेक शतकांपासून सुरु आहे.स्वातंत्र्योत्तर काळात विश्व हिंदु परिषदेने या अंदोलनाचे नेतृत्व केले. वास्तविक संपूर्ण हिंदुसमाजाचे हे अंदोलन होते. सर्वसामान्य हिंदु आपला जीव धोक्यात घालून या अंदोलनात सहभागी झाला होता. आणि 6 डिसेंबर 1992 रोजी आमच्या देशावरील गुलामीचा कलंक आपल्या समाजाने उध्वस्त केला,यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर असते तर त्यांनी “भारतीय इतिहासातील सातवे सोनेरी पान” असे त्या दिवसाचे वर्णन केले असते.

आंदोलन कशासाठी?

हा केवळ मंदिर -मशिदीचा वाद नाही. आपल्या देशावर अनेक परकीय मुस्लिम आक्रमकांनी आक्रमणे केली. त्यांनी हिंदुंवर केलेल्या अत्याचारांचा उल्लेख करतांना महात्मा जोतिबा फुले शिवरायांच्या पोवाड्यात लिहितात,

काबुला सोडी | नदांत उडी ||
ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||
बामना बोडी | इंद्रिये तोडी ||
पिंडीस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||
गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||
खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||
भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||
मुर्तीस काढी | काबूला धाडी||
झादीस तोडी | लुटली खेडी ||
गडांस वेढी | लावली शिडी ||
हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||
राज्यास बेडी | कातडी काढी ||
गर्दना मोडी | कैलासा धाडी ||
देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
उडवी घोडी | कपाळा आढी ||
मीजास बडी | ताजीम खडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||
गायनी गोडी || थैलिते सोडी ||

[Ref: महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाड्मय, पाचवी आवृत्ती].

केवळ हिंदुंची श्रध्दास्थानेच मुस्लिम आक्रमकांनी उध्वस्त केली असे नाही,तर त्यांना अपमानास्पद वागणुक दिली.त्यांच्यावर जिझिया कर लादला.जिझिया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद पूर्णतः उधृत केला आहे. हा संवाद पुरेसा बोलका आहे.

“अल्लाह सांगतो की, हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत; आणि प्रेषीतांनीच आपल्याला आज्ञा केली आहे की, हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा, बंधक बनवा, त्यांची मालमत्ता लुटा. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना जिझिया घेऊन सोडतो. हनिफी सोडुन इतर पंथात जिझिया पर्याय नाही. हिंदुंपुढे दोनच पर्याय आहेत – ‘इस्लाम किंवा मृत्यू’.”
या उधृता नंतर निष्कर्ष काढताना डाॅ.आंबेडकर लिहीतात : “मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतची ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे”.
[Ref: डॉ बाबासाहेब आंबेडकर समग्र वाड्मय खंड ८- पान क्र ६३].

कोणताही परकीय आक्रमक राष्ट्रीय जनतेच्या मनातील राष्ट्रीय भावना ठेचून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. बाबराने आमच्या देशावर आक्रमण केले. त्याच्या मीर बाॅंकी नावाच्या सेनापतीने श्रीरामजन्मभुमीवरील मंदिर पाडुन तिथे एक ढांचा बांधला. हा ढांचा आमच्या अपमान आणि गुलामीचे चिन्ह होता.आमच्या राष्ट्रीय स्वाभिमानाची पुनर्स्थापना करण्यासाठी याठिकाणी श्रीराममंदिराची आवश्यकता आहे. औरंगजेबानेदेखील महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांची आणि शहरांची नावे बदलली होती उदा. रायगडाचे नाव इस्लामगड ठेवले होते. सिंहगड किल्ल्याचे नाव “बक्षिंदाबक्ष” तर पुण्याचे नामकरण “मुहियाबाद” असे केले होते. परंतु येथील राष्ट्रीय वृत्तीच्या मराठ्यांनी त्या नावांचे नामोनिशाण मिटवून पूर्वीचीच नावे कायम केली. कारण हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय होता.
याच कारणासाठी श्रीरामजन्मभूमी मुक्ती अंदोलनाचे प्रयोजन होते.

पोलंडचे उदाहरण

परकिय आक्रमकांनी जेव्हा जेव्हा आपल्या देशावर आक्रमणे केली,तेव्हा त्यांनी येथील मठ-मंदिरे उध्वस्त करुन येथील समाजाचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. या मंदिरांच्या जागी मुस्लिम आक्रमकांनी ज्या वास्तु उभ्या केल्या,त्या आमच्यासाठी अत्यंत अपमानास्पद आहेत. सुप्रसिध्द इतिहासकार अर्नोल्ड टाॅयन्बी यांनी दिल्लीतील 1960 साली झालेल्या एका भाषणात सांगितले की ” तुमच्या देशात औरंगजेबाने उभारलेल्या मशिदी तर अत्यंत अपमानास्पद असूनही तुम्ही टिकवल्या आहेत.” एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रशियाने जेव्हा पोलंड जिंकला तेव्हा त्यांनी पोलंडवरील विजयाचे स्मारक म्हणून वाॅर्सा शहराच्या मधोमध एक रशियन आॅर्थाडाॅक्स चर्च उभे केले. पहिल्या महायुध्दानंतर जेव्हा पोलंड स्वतंत्र झाला तेव्हा पहिले काम कुठले केले असेल तर रशियाने बांधलेले ते चर्च पाडले आणि रशियन वर्चस्वाचे चिन्ह नष्ट केले. कारण पोलंडवासीयांना ते चर्च आपल्या अपमानाची सतत आठवण करुन देत होते. भारतातील राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी याच कारणासाठी श्रीरामजन्मभूमीचे अांदोलन सुरु केले होते.

छत्रपती शिवाजीमहाराजांचे उदाहरण

खरेतर छत्रपती शिवाजीमहाराज यांनी या कार्याची सुरुवात पूर्वीच केली आहे.तिरुवन्नामलाई येथील शिव मंदिर म्हणजेच सोनाचलपती मंदिर आणि समोरत्तीपेरूमल येथील विष्णू मंदिर आक्रमकांनी बाटविले होते आणि ही मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी उभ्या केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी ह्या दोन्ही मशिदी पाडून त्यांचे पुन्हा मंदिरामध्ये रुपांतरण केले.ही सारी हकीकत “शिवचरित्र साहित्य खंड -8 ,लेखांक 15 आणि पृष्ठ क्र 55-56 वर आली आहे. या गोष्टीला आधार म्हणून आणखी एक प्रत्यक्ष शिवकालीन पुरावा मिळतो. तो म्हणजे रघुनाथ नारायण हणमंते यांनी लिहीलेल्या “राजव्यवहारकोश” या ग्रंथात. त्यात ही मंदिरे पुन्हा उभारावी, अशी आज्ञा शिवरायांनी रघुनाथपंताला दिल्याचे लिहिले आहे.

“उत्सादितां चिरतरं यवनै प्रतिष्ठाम्
शोणाचलेशितुरयं विधिवदविधाय l
श्रीमृष्णवृध्दगिरिरुक्मसभाधिपानाम्
पूजोत्सवान्प्रथयति स्म सहात्मकीर्त्या ll80

तुम्ही जर आमची मंदिरे पाडुन आमच्या स्वाभिमानाचा अपमान कराल,तर आम्हीही हट्टाने त्यांचे पुनर्निर्माण करु असा संदेशच शिवाजीमहाराजांनी मुस्लिम आक्रमकांना आपल्या कृतीतुन दिला.

जेझुईट पाद्री आंद्रे फैर यांचे 1678 चे एक पत्र Historical miscellany
published by BISM ,pune ( 1928,p 113) यात छापलेले आहे,त्यातही शिवाजीमहाराजांनी मुसलमानांच्या मशिदी भ्रष्ट केल्याचे तो या पत्रात लिहीतो.

कोणत्याही देशापासून त्याचा धर्म आणि संस्कृती हिरावून घेता येत नाही.स्वाभिमान हिरावून घेता येत नाही. परकीय आक्रमकांनी जर आमच्या स्वाभिमानाची छेडछाड केली तर त्याला जशास तसे उत्तर द्यावे आणि गुलामीची चिन्हे मिटवून पुन्हा आपल्या मानबिंदुंची पुनर्प्रतिष्ठापना करणे हाच शिवचरित्राचा बोध आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीही संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी मुघलांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचा जिर्णोध्दार आणि पुनर्बांधणी केली.

संदर्भ

1) अयोध्या सत्यासत्य (संपादीत)
2) महात्मा फुले आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समग्र वाड्मय
3) श्री.राजेश माहेश्वरी यांचा लेख
4) श्री.सत्येन वेलणकर यांचा लेख

✍🏻 – रवींद्र गणेश सासमकर (लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)

Leave a Reply