मुस्लिम महिलांनाही एकापेक्षा जास्त पती…

जावेद अख्तर यांची मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर टिका

मुंबई,(प्रतिनिधी): “जर मुस्लीम पतींना ४ लग्न करण्याचा हक्क असेल तर मग मुस्लिम महिलांनाही अशाचप्रकारे एकाच वेळी एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क असायला हवा. फक्त पतीने एकापेक्षा जास्त पत्नी ठेवल्याने पुरुष आणि महिलांमध्ये समानता होत नाही. एकाच वेळा एका पेक्षा जास्त लग्नं करणं हे देशाचा कायदा आणि संविधानाच्या नियमांच्या विरोधात आहे.” अशा कठोर शब्दात हिंदी गीतकार जावेद अख्तर यांनी मुस्लीम पर्सनल लॉ वर टीका केली आहे.

गीतकार जावेद अख्तर हे आपले परखड विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.यावेळी त्यांनी आपला मोर्चा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडे वळवला आहे.यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.मुस्लिम कट्टरतावादी मंडळींना जावेद अख्तर यांची टीका झोंबणार हे नक्की.

पुढे बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “कॉमन सिव्हिल कोडचा अर्थ फक्त असा नाही की सर्व समुदायातील लोकांसाठी एकच कायदा आहे. तर हा कायदा महिला आणि पुरुष यांच्यातही समानता असावी असं सांगतो. दोघांसाठीही समान मापदंड असायला हवेत. मी सुरुवातीपासूनच कॉमन सिव्हील कोडचं पालन करतो. ज्या व्यक्तीला महिला आणि पुरुष यांच्या समानतेची जाणीव आहे त्या प्रत्येक व्यक्तीने कॉमन सिव्हिल कोडचं पालन करायला हवं. माझ्या संपत्तीतही माझ्या मुलाएवढाच माझ्या मुलीचाही हक्क आहे.” असेही जावेद अख्तर यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply